ऐतिहासिक शकुंतला रेल्वेच्या जागेवर कचर्याचे ढीग
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अचलपूर स्थानक बनले उकिरडा

नगर परिषद आणि ग्रामपंचायतीची भूमिका संशयास्पद
अचलपूर /17 नोव्हेंबर – ब्रिटिश काळातील ऐतिहासिक शकुंतला रेल्वे मार्ग बंद पडल्यानंतर अचलपूर रेल्वे स्थानकाच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. या जागेत अचलपूर नगर परिषद की देवमाळी ग्रामपंचायतीचा कचरा पडतो असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. स्वच्छ भारत मोहिमेवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना स्थानक परिसरात कचर्याचे ढीग साचल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अचलपूर ते मूर्तिजापूर दरम्यान धावणारी शकुंतला रेल्वे एकेकाळी या भागाची जीवनवाहिनी मानली जात होती. मात्र ही रेल्वे सेवा बंद झाल्यानंतर अचलपूर स्थानकाचा विस्तीर्ण परिसर ओस पडला आहे. शहराच्या अगदी जवळ असलेल्या या जागेवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने काही लोक मनमानी पद्धतीने या जागेचा वापर करत आहेत. दररोज या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा आणून टाकला जात असल्याने या ऐतिहासिक ठिकाणाला अक्षरशः उकिरड्याचे स्वरूप आले आहे. एककीकडे केंद्र आणि राज्य शासन स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी मोठा निधी खर्च करत आहे. दुसरीकडे शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या शकुंतला रेल्वेच्या जागेत कचर्याचे साम्राज्य पसरल्याने स्वच्छता मोहिमेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देवमाळी ग्रामपंचायतीकडे कचरा टाकण्यासाठी पुरेशी जागा नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने गोळा केलेला कचरा जागेअभावी रेल्वे स्थानकाच्या जागेत टाकला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून रेल्वेच्या जागेवर कचरा टाकणार्यांवर कडक कारवाई करावी आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.





