अमरावती विभागातील साडेचार लाख शेतकर्यांना कर्जमाफीचा दिलासा
4,291 कोटींची रक्कम शेतकर्यांच्या खात्यांत जमा

बुलढाणा जिल्हा लाभार्थी संख्येत आघाडीवर
अमरावती /18 नोव्हेंबर- राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे अमरावती विभागातील 4 लाख 65 हजार 872 शेतकर्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. या शेतकर्यांच्या कर्जखात्यांत एकूण 4 हजार 290 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक 1 लाख 59 हजार 263 शेतकर्यांना 1 हजार 463 कोटी 12 लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. तर अमरावती जिल्ह्यातील 81 हजार 619 शेतकर्यांच्या खात्यांत 783 कोटी 22 लाख रुपये जमा झाले आहेत. विभागातील पाच जिल्ह्यांतील शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळत असून, पात्र शेतकर्यांना कमाल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात आहे. राज्य शासनाने 2 जून 2026 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ही योजना सुरू करण्यात आली. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेली पीककर्जे तसेच पुनर्गठित आणि पुन्हा मुदत वाढविलेली कर्जे या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आली आहेत. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत न भरलेली कर्जे माफ केली जात आहेत. या योजनेची अंमलबजावणी संगणकीय पद्धतीने केली जात असून, महाआयटीकडे त्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विभागातील बँकांनी 6 लाख 74 हजार 515 थकीत कर्जखात्यांची माहिती संकेतस्थळावर जमा केली आहे. त्यापैकी आधार पडताळणी पूर्ण झालेल्या 4 लाख 94 हजार 179 शेतकर्यांमधून 4 लाख 65 हजार 872 शेतकरी पात्र ठरले आहेत. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील 1 लाख 59 हजार 263 शेतकर्यांना 1 हजार 463 कोटी 12 लाख रुपये, यवतमाळमधील 1 लाख 7 हजार 494 शेतकर्यांना 985 कोटी 75 लाख रुपये, अमरावतीमधील 81 हजार 619 शेतकर्यांना 783 कोटी 22 लाख रुपये, वाशिममधील 58 हजार 919 शेतकर्यांना 530 कोटी 99 लाख रुपये आणि अकोल्यातील 58 हजार 577 शेतकर्यांना 527 कोटी 68 लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, आधार पडताळणी बाकी असलेल्या शेतकर्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकर्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे.





