अवैध सावकारीप्रकरणी चांडकविरुद्ध गुन्हा दाखल
सहायक निबंधक प्रमोद वर्धेकर यांच्या तक्रारीवरून कारवाई

संशयास्पद कागदपत्रे पोलिसांकडून जप्त
अमरावती/18 नोव्हेंबर – शहरात अवैध सावकारीचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारींमधून आणखी एक प्रकरण समोर आले आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत नवनीत रतनलाल चांडक (55) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकार विभागाचे सहायक निबंधक प्रमोद मधुकरराव वर्धेकर (55) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. संबंधित ठिकाणांची तपासणी करून काही संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, या प्रकरणामुळे शहरातील अवैध सावकारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद मधुकरराव वर्धेकर हे सहकार विभागात सहायक निबंधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार नवनीत रतनलाल चांडक, रा. देवी रेसिडेन्सी, आराधना चौक, कठोरा रोड, अमरावती याच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमातील कलम 23, 39 आणि 45 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत सहकार विभागाच्या सहायक निबंधकांनी पथक तयार करून संबंधित ठिकाणी तपासणी केली होती. या तपासादरम्यान काही कागदपत्रे संशयास्पद आढळल्याने ती जप्त करण्यात आली. जप्त कागदपत्रांची सध्या तपासणी सुरू असून, त्यातून सावकारीच्या व्यवहारांशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
वर्धेकर यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि अन्य संबंधित बाबींची पडताळणी केली जाणार आहे. यापूर्वीही सिटी कोतवाली आणि गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध सावकारीची 3 प्रकरणे दाखल झाली आहेत.
यंदा आतापर्यंत 2 डझनहून अधिक अवैध सावकारांविरुद्ध सहकार विभागाने कारवाई केल्याची माहिती आहे. त्यामुळे नव्या कारवाईने अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
3 गुन्हे दाखल
अमरावती शहरात अवैध सावकारीच्या तक्रारी वाढत असल्याने सहकार विभाग आणि पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविला आहे. यापूर्वी सिटी कोतवाली आणि गाडगेनगर हद्दीत 3 गुन्हे दाखल झाले आहेत. यंदा 2 डझनहून अधिक सावकारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. नव्या प्रकरणात संशयास्पद कागदपत्रे जप्त झाल्याने तपासातून आणखी व्यवहार उघड होण्याची शक्यता आहे.





