गणरायाच्या आगमनाआधी पावसाची जोरदार हजेरी
पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता

* पिकांना दिलासा, शेतकर्यांच्या आशा पल्लवित
अमरावती /11सप्टेंबर – गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आलेला असतानाच अमरावतीसह पश्चिम विदर्भात शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. अमरावती शहरात दुपारी ढग दाटून येत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 35 ते 36 अंशांच्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. हवामान तज्ज्ञ डॉ. अनिल बंड यांनी अमरावतीसह अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत 13 सप्टेंबरपर्यंत चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पावसामुळे पाण्याअभावी अडचणीत आलेल्या सोयाबीन कापूस आणि तुरीच्या पिकांना आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील अनेक शेतांमधील पिके कोमेजली होती. विशेषतः सोयाबीनची अवस्था चिंताजनक झाली होती. वाशिम जिल्ह्यात काही शेतकर्यांनी उभ्या पिकांतून ट्रॅक्टर चालविण्याची वेळ आली होती. अशा परिस्थितीत शुक्रवारी झालेल्या पावसाने शेतकर्यांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत. पुढील काही दिवस चांगला पाऊस झाल्यास पिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. अमरावती शहरात दुपारी 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट होऊन पाऊस सुरू झाला. सुमारे 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. अचानक आलेल्या पावसामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. मंडपातील सजावटीचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्लास्टिक आणि ताडपत्र्यांचा आधार घ्यावा लागला. गणेशमूर्ती विक्रेत्यांनीही मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी लगबग केली. ग्रामीण भागात पोळ्याच्या उत्साहात असलेल्या नागरिकांनाही पावसामुळे काही काळ धावपळ करावी लागली. मात्र पावसामुळे वातावरण गार झाल्याने नागरिकांसह शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.





