डफरीन अग्निकांडातील दोषींवर कठोर कारवाई करणार

आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा इशारा

डफरीनच्या जळीत वॉर्डाची केली पाहणी
8 दिवसांत समिती शासनाला अहवाल देणार

अमरावती /27 ऑगस्ट- डफरीन जिल्हा महिला रुग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीची गंभीर दखल घेत दोषींना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिला. गुरुवारी त्यांनी आगीच्या घटनेनंतर डफरीन रुग्णालयाला भेट देवून आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली असून समिती आठ दिवसांत अहवाल शासनाला देणार आहे. अहवालाच्या आधारे संबंधित अधिकारी कर्मचारी किंवा संस्थेविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने आवश्यक सूचना दिल्या होत्या. प्रभावित कुटुंबांना आर्थिक मदत देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आगीमुळे नवजात अतिदक्षता कक्ष आणि विशेष नवजात उपचार कक्षाच्या सेवांवर परिणाम झाल्याने अनेक बालकांना खासगी रुग्णालयांत उपचारासाठी हलविण्यात येत आहे. या बालकांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार असल्याचे मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले. कोणतेही नवजात बालक आर्थिक अडचणीमुळे उपचारापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार रुग्णालय प्रशासनाला अग्निसुरक्षा तपासणी करून घेण्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र निर्धारित वेळेत अग्निसुरक्षा तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे. ही बाब गंभीर दुर्लक्षाची असून चौकशी समिती अग्निसुरक्षा तपासणी का झाली नाही, कुठे चूक झाली आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे, याची सखोल तपासणी करणार आहे. आगीच्या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून नवजात बालकांना सुरक्षित बाहेर काढणार्‍या डॉक्टर, परिचारिका आणि कंत्राटी कर्मचार्‍यांचे मेघना बोर्डीकर यांनी कौतुक केले. संकटाच्या काळात दाखविलेल्या धैर्याची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून त्यांच्या हिताचा योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. डफरीन रुग्णालयातील घटना ही केवळ एका रुग्णालयापुरती मर्यादित नसून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा असल्याचेही राज्यमंत्र्यांनी नमूद केले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालयांतील अग्निसुरक्षा, आपत्कालीन व्यवस्था, वीज व्यवस्था, वैद्यकीय उपकरणांची गुणवत्ता आणि नियमित तपासणी अधिक कडक करण्याचा निर्णय शासन घेणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सहज आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मेघना बोर्डीकर यांनी सांगितले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष व आ. प्रताप अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी, मनपातील विरोधी पक्षनेते चेतन गावंडे, नगरसेवक आशीष अतकरे, माजी पार्षद प्रणीत सोनी, भाजप महिला शहराध्यक्ष सुधा तिवारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार आणि विशेष नवजात उपचार कक्ष विभागप्रमुख डॉ. प्रीती इंगळे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button