वाघाच्या हल्ल्यात शेतकर्याचा मृत्यू
मोर्शी तालुक्यातील जुना भांबोरा शेतशिवारातील घटना

पीडित कुटूंबियांच्या मदतीसह नोकरीची ग्रामस्थांची मागणी
आरती वानखडे यांच्या मध्यस्थीने तणाव निवळला
मोर्शी /27 ऑगस्ट – मोर्शी तालुक्यातील जुना भांबोरा शेतशिवारात गुरुवारी वाघाच्या हल्ल्यात 52 वर्षीय शेतकरी चरणदास इखे यांचा मृत्यू झाल्याने भांबोरा परिसरासह आसपासच्या गावांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेनंतर कुटुंबीय आणि गावकर्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यास नकार देत मृताच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत देण्यासह कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतदेह हलवू न देण्याच्या भूमिकेमुळे काही तास तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र गावकर्यांचा संताप कायम होता.
जंगल परिसरात वाघासह अन्य वन्यप्राण्यांचा वाढलेला वावर आणि शेतकर्यांच्या सुरक्षेकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा मुद्दा गावकर्यांनी उपस्थित केला. शेतात काम करताना जीव मुठीत घेऊन जावे लागत असून वनविभागाने ठोस सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा आरती राजेश वानखडे यांनी घटनास्थळी पोहोचून मृताच्या कुटुंबीयांसह गावकर्यांशी चर्चा केली.
त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत गावकर्यांच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. चर्चेनंतर वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला शासनाकडून जाहीर 25 लाख रुपयांच्या मदतीपैकी 5 लाख रुपयांची तातडीची अंतरिम मदत देण्यावर सहमती झाली. तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
या आश्वासनानंतर गावकर्यांचा संताप काही प्रमाणात शांत झाला आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर चरणदास इखे यांचा मृतदेह मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. यावेळी मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे यांच्यासह महसूल आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. वाघाच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि जंगलालगतच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मृत शेतकर्याच्या कुटुंबाला मदत मिळण्याबरोबरच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जंगलालगतच्या गावांमध्ये ठोस सुरक्षा व्यवस्था उभारण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.
प्रशासनाच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचे आंदोलन मागे
वाघाच्या हल्ल्यात चरणदास इखे यांचा मृत्यू झाल्यानंतर गावकर्यांनी मृतदेह रोखून धरत आर्थिक मदत आणि शासकीय नोकरीची मागणी केली. आरती राजेश वानखडे यांच्या मध्यस्थीनंतर प्रशासनाने 25 लाख रुपयांच्या मंजूर मदतीपैकी 5 लाख रुपये तातडीने देण्यास सहमती दर्शविली. कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासनही देण्यात आले. त्यानंतर तणाव निवळला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला.




