नेपाळमध्ये अडकलेले 106 नागपूरकर सुरक्षित

प्रशासनाकडून परतीची व्यवस्था, 29 ऑगस्टला नागपुरात पोहोचणार

नागपूर /27 ऑगस्ट : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर काठमांडू येथे गेलेल्या नागपूर जिल्ह्यातील सुमारे 106 नागरिकांची प्रकृती व स्थिती सुरक्षित आहे. या समूहात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. प्रशासनाचा या नागरिकांशी सातत्याने संपर्क असून त्यांच्या परतीच्या प्रवासावरही देखरेख ठेवली जात आहे.
श्री. स्वामी श्रीधर महाराज यांच्या समूहासोबत हे नागरिक 22 ऑगस्ट रोजी पर्यटन व धार्मिक भेटीसाठी काठमांडू येथे गेले होते. दरम्यान, 26 ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये फ्लॅश फ्लडची घटना घडली. मात्र, या घटनेचा नागपूरच्या नागरिकांवर कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही. सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे प्रशासनाला प्राप्त माहितीतून स्पष्ट झाले आहे.
सद्यस्थितीत हे सर्व नागरिक काठमांडू येथील पशुपतिनाथ मंदिर पार्किंग परिसरातील माहेश्वरी समाजाच्या ठिकाणी सुरक्षितपणे वास्तव्यास आहेत. नेपाळ प्रशासनाकडूनही त्यांना आवश्यक ती मदत व सहकार्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांच्या सद्यस्थितीची नियमित माहिती घेतली जात आहे. 27 ऑगस्ट रोजी हे नागरिक काठमांडूहून जनकपूर आणि पुढे नेपाळ-भारत सीमेकडे रवाना झाले आहेत. 28 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत जनकपूर येथे पोहोचण्याचे नियोजन आहे. त्यानंतर भारतात प्रवेश करून पुढे पटना येथे जातील. पटना येथून 28 ऑगस्ट रोजी दानापूर रेल्वे स्थानकावरून संघमित्रा एक्सप्रेसने नागपूरला परततील.

संबंधित बातम्या

Back to top button