मंत्रालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा
परवाना मिळवून देण्यासाठी लिपिक जाळ्यात

* लाचेच्या व्यवहारात मंत्रालयाचा दुसरा मजला हादरला
मुंबई /12 फेब्रुवारी : राज्याच्या सत्तेचे केंद्र असलेल्या मंत्रालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी एक मोठी कारवाई केली. अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. एका वैद्यकीय दुकानाचा निलंबित परवाना पुन्हा मिळवून देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. मंत्रालयाच्या दुसर्या मजल्यावर ही कारवाई झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबईतील मंत्रालय परिसरात भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रति बंधक विभागाने गुरुवारी जोरदार सापळा रचला होता. या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाचा लिपिक राजेंद्र ढेरंगे हा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, एका तक्रारदाराच्या औषध विक्री दुकानाचा (मेडिकल) परवाना काही कारणास्तव निलंबित करण्यात आला होता. हा परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी आरोपी राजेंद्र ढेरंगे याने तक्रारदाराकडे सुरुवातीला 50 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराची एवढी रक्कम देण्याची इच्छा नसल्याने अखेर 35 हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली. या व्यवहाराची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती.




