ऊर्जा क्षेत्रात ‘इतिहासावर’ जगता येत नाही, अधिक जोमाने कामाला लागा

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचे आवाहन

अमरावती/23एप्रिल– अमरावती परिमंडळाने 2025-26 या आर्थिक वर्षात ग्राहकांना दर्जेदार सेवा पुरवत आणि उत्कृष्ट महसूल वसुली करत राज्यस्तरावर तिसरा क्रमांक मिळवला आहे. महावितरणच्या या यशाचे कौतुक करतानाच भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन संचालक राजेंद्र पवार यांनी केले.अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित आर्थिक वर्ष 2025-26 कामगिरी गौरव सोहळ्यात अमरावती परिमंडळाचा गौरव करण्यात आला.
महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते विविध निकषांवर सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या 14 सांघिक कार्यालयांना फिरता चषक आणि प्रशस्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील नऊ तर यवतमाळ जिल्ह्यातील पाच कार्यालयांनी बाजी मारली. यावेळी मुख्य अभियंता अशोक साळुंखे, मुख्य अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, प्रवीण दरवली आणि दीपाली माडोलवार उपस्थित होते.वेळेत वीजजोडणी, थकबाकी वसुली, वीज चोरीला आळा आणि सौर प्रकल्पांची अंमलबजावणी या निकषांवर ही निवड करण्यात आली. राजेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे महावितरणमध्ये झालेल्या क्रांतिकारी बदलांचे कौतुक केले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मुळे 23 लाख शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळत असून प्रधानमंत्री सूर्यघर योजनेद्वारे 5.42 लाख घरांवर सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. अशोक साळुंखे यांनी कर्मचार्‍यांच्या परिश्रमाचे कौतुक केले, तर राजेश नाईक यांनी सचोटीने काम करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहव्यवस्थापकीय संचालक रूपेश देशमुख यांनी केले. पुरस्कारांचे वाचन वरिष्ठ व्यवस्थापक शिरीष शहा यांनी तर सूत्रसंचालन विकास बांबल आणि आद्यश्री कांबे यांनी केले. आभार उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी मानले.

संबंधित बातम्या

Back to top button