पोटे अभियांत्रिकीमध्ये सामूहिक स्तोत्र पठण
‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने महाविद्यालयाचा परिसर दुमदुमला

अमरावती /15 सप्टेंबर: ऋषीपंचमी तसेच संत गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात भक्तिमय वातावरणात सामूहिक स्तोत्र पठण व महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या आध्यात्मिक उपक्रमामुळे महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. कार्यक्रमाची सुरुवात संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून करण्यात आली. त्यानंतर प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे स्तोत्र पठण केले. सामूहिक स्वरात करण्यात आलेल्या स्तोत्र पठणाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. त्यानंतर संत गजानन महाराजांची भक्तिभावाने महाआरती करण्यात आली. यावेळी ‘गण गण गणात बोते’ या पवित्र मंत्राचा सामूहिक जयघोष संपूर्ण परिसरात घुमला. भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेने भारलेल्या या वातावरणामुळे विद्यार्थ्यांसह उपस्थित सर्वांना आध्यात्मिक अनुभूती मिळाली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि संतपरंपरेचे संस्कार रुजावेत, तसेच सकारात्मक विचारांना चालना मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.





