गणेशोत्सवात चाकू घेऊन मित्राचा शोध घेणार्यास अटक
राजापेठ पोलिसांची कारवाई, 13 इंची धारदार चाकूही जप्त

अमरावती/15 सप्टेंबर- गणेशोत्सवाच्या काळात दोन तरुणांमध्ये झालेला वाद चिघळून गंभीर घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. दोघेही चाकू घेऊन एकमेकांचा शोध घेत असल्याची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करून यश अजय गुप्ता याला चाकूसह अटक केली. त्याच्याकडून सुमारे 13 इंच लांबीचा धारदार लोखंडी चाकू जप्त करण्यात आला.
या कारवाईमुळे संभाव्य रक्तपात टळला. प्रकरणातील उज्ज्वल उर्फ छाटा सरकार भुसारी वय 19 वर्षे हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे. ही घटना 14 सप्टेंबरच्या रात्री सुमारे 11 वाजता आदर्श नगर येथील श्री विनायक गणेशोत्सव मंडळाच्या परिसरात घडली. मंडळाचे अध्यक्ष यश अजय गुप्ता आणि सदस्य उज्ज्वल भुसारी यांच्यात वाद झाला होता. वाद वाढल्यानंतर दोघेही चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी शशि शेळके यांनी वरिष्ठांना कळविले. ठाणेदार संदीप चव्हाण यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकाने शोधमोहीम सुरू केली. यश गुप्ता याला पकडून त्याच्याकडून सुमारे 9 इंच पाते आणि 4 इंच मुठ असलेला चाकू जप्त करण्यात आला. या प्रकरणी शस्त्र कायदा तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार उज्ज्वल भुसारीचा शोध सुरू असून गणेश मंडळ पदाधिकारी व नातेवाईकांना पोलिसांनी समज दिली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहायक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.





