‘मला माझे बाळ आणून द्या’

मृत अर्भकांना घेऊन जाताना नातेवाईकांचा टाहो

डफरीनच्या आगीत मातांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

अमरावती/24 ऑगस्ट जिल्हा स्त्री रुग्णालय असलेल्या डफरीन रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाला सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयात मातांचा आक्रोश, नातेवाईकांचे अश्रू आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. ‘माझे बाळ परत आणून द्या’, ‘मला माझे बाळ आणून द्या’, अशा हृदय पिळवटून टाकणार्‍या हाका रुग्णालय परिसरात घुमत होत्या. काही दिवसांपूर्वीच बाळाला जन्म देणार्‍या मातांसमोर त्यांचे निष्पाप बाळ निर्जीव पडल्याचे दृश्य पाहून अनेकांचे काळीज हेलावून गेले.
या आगीत मृत्यू झालेल्या 3 अर्भकांनी अजून नीट डोळेही उघडले नव्हते. जग पाहण्याआधीच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मृत अर्भकांचे शवविच्छेदन करण्यासाठी इर्विन रुग्णालयात नेण्याची प्रक्रिया सुरू होताच नातेवाईकांचा बांध फुटला. मातांनी आणि नातेवाईकांनी मृतदेहांना कवटाळून आक्रोश केला. ‘आमचे बाळ आम्हाला द्या,शवविच्छेदनासाठी नेऊ नका’, अशी विनवणी करीत अनेक जण ढसाढसा रडले. हे दृश्य पाहून रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी आणि पोलिसही भावुक झाले. घटनेची माहिती पसरताच नागरिक, लोकप्रतिनिधी आणि मृत अर्भकांचे नातेवाईक मोठ्या संख्येने डफरीन रुग्णालयात दाखल झाले. वाढती गर्दी आणि तणावाची परिस्थिती पाहता रुग्णालय परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण रुग्णालय परिसरावर शोककळा पसरली असून, या दुर्घटनेमागील कारणे आणि रुग्णालयातील सुरक्षिततेच्या व्यवस्थेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button