11 रुपयांच्या सलाईन नळीची 325 रुपयात विक्री

खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीवर तुकाराम मुंढेंचे केंद्राला पत्र

‘ट्रेड प्राइज’ आणि ‘एमआरपी’तील फरकावर नियमनाची शिफारस

मुंबई /16 सप्टेंबर: रुग्णालयांमध्ये उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या वैद्यकीय साहित्याच्या किमती आणि त्यावर छापलेल्या कमाल किरकोळ किमतीतील (एमआरपी) तफावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रुग्णालयाला अवघ्या 11.05 रुपयांना मिळणार्‍या आयव्ही इन्फ्युजन सेटची (सलाईन नळी) किंमत तब्बल 325 रुपये असल्याचे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या पाहणीत समोर आले आहे. या खरेदी दर आणि एमआरपीतील तब्बल 2 हजार 841 टक्के फरकावर प्रश्न उपस्थित करत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून वैद्यकीय साहित्याच्या किमतीतील अशा तफावतीवर नियमन करण्याची शिफारस केली आहे.
वैद्यकीय उपचारांचा खर्च ठरविताना औषधांच्या किमतींबाबत काही प्रमाणात नियमनाची व्यवस्था आहे. मात्र, रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या वैद्यकीय उपकरणे आणि उपभोग्य साहित्याच्या बाबतीत खरेदी किंमत आणि छापील एमआरपी यांच्यातील फरकाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंढे यांनी याच मुद्द्याकडे केंद्राचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रात करण्यात आलेल्या पाहणीत आयव्ही इन्फ्युजन सेटव्यतिरिक्त सिरिंज आणि कॅथेटरच्या किमतीतही मोठी तफावत आढळली. 6.75 रुपयांना खरेदी केलेल्या सिरिंजची एमआरपी 57.20 रुपये, तर 29.41 रुपयांना खरेदी केलेल्या कॅथेटरची एमआरपी 310 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ऑक्सिजन मास्क, नेब्युलायझर यांसारख्या वैद्यकीय साहित्याच्या किमतींमध्येही लक्षणीय फरक असल्याचे पाहणीत आढळले आहे.
रुग्णालयात उपचार घेत असताना कोणत्या कंपनीचे किंवा कोणत्या किमतीचे साहित्य वापरले जात आहे, याची तुलना करण्याची संधी रुग्णाला अनेकदा मिळत नाही. पॅकेटवर छापलेली एमआरपी हीच त्या साहित्याची प्रत्यक्ष किंमत असल्याचे रुग्णाला वाटू शकते. त्यामुळे उत्पादक किंवा वितरकाकडून रुग्णालयाला वस्तू किती किमतीला मिळते आणि रुग्णाकडून त्यासाठी किती रक्कम आकारली जाते, यातील फरक पारदर्शकपणे समोर येणे आवश्यक असल्याचा मुद्दा मुंढे यांनी मांडला आहे.

Back to top button