मनोज जरांगेंची तब्येत खालावली तरीही मुंबईच्या आंदोलनावर ठाम
पाटोद्यात डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा; सलाईन लावून उपचार

बीड /16 सप्टेंबर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची उपोषणाच्या 19 व्या दिवशी बुधवारी (16 सप्टेंबर) दुपारी प्रकृती कमालीची खालावल्याचे समोर आले. त्यांच्या मुंबई दौर्याबाबत सध्या अनिश्चितता निर्माण झाली आहे. बुधवारी दुपारपर्यंत ते बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्कामी होते. त्यांना जागेवरून हलणेही कठीण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच, त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. असे असले तरीही मराठा आरक्षणाचा लढा मुंबईत पोहोचवण्याच्या ध्येयावर जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत.
दुपारी 1 वाजताच्या सुमारास पाटोद्यात डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांची तपासणी केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश सोळंके यांच्या वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली असता त्यांची शुगर आणि रक्तदाब अत्यंत कमी झाल्याचे समोर आले आहे. उपचार न घेतल्यास त्यांची प्रकृती चिंताजनक होऊ शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. मनोज जरांगेंनी सुरुवातीला कोणतीही वैद्यकीय तपासणी किंवा उपचार घेण्यास नकार दिला होता. पण, डॉक्टरांच्या आग्रहानंतर त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. अधिककाळ उपोषण आणि प्रवासाच्या दगदगीमुळे त्यांच्यापोटात आणि पायात तीव्र जळजळ होत असून, प्रचंड अशक्तपणामुळे त्यांना जागेवरून उठणेही कठीण झाले असल्याचे समोर आले आहे.





