माजी गृहमंत्र्याकडूनच महिला पोलिसाचा विनयभंग!

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप

मुंबई/24 जुलै- मुंबईत सध्या सुरू असलेल्या विविध आंदोलनांदरम्यान विनयभंगाच्या आरोपांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला दादरमधील ’सीजेपी’ (उगझ) आंदोलनादरम्यान साध्या वेशातील पोलिसाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, तर दुसर्‍या बाजूला भाजपने थेट माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांच्यावरच एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या दोन्ही घटनांमुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ शेअर करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. रस्त्यावर ठिय्या मांडणार्‍या महिला कार्यकर्त्यांना जेव्हा महिला पोलीस उठवत होत्या, तेव्हा अनिल देशमुख यांचा हात एका महिला पोलिसाला लागून विनयभंग झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ-स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी मुंबई पोलिसांवर खोटे आरोप करणार्‍या संधीसाधू लांडग्यांनो, आता डोळे उघडा आणि नीट बघा..! ज्या मुंबई पोलिसांच्या नावाने कालपर्यंत थयथयाट करत होतात, त्याच मुंबई पोलीस दलातील एका महिला पोलिसाचा विनयभंग तुमच्याच महाविकास आघाडीचा माजी गृहमंत्री करत आहे. आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? ताकद असेल तर त्याला आघाडीतून तात्काळ हद्दपार करा! दरम्यान, या आरोपांवर अद्याप राष्ट्रवादीकडून अथवा अनिल देशमुखांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या घटनेवरून येणार्‍या काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या

Back to top button