विठ्ठलाच्या साक्षीने कर्जमुक्तीचा श्रीगणेशा!
पंढरीतून 56 लाख शेतकर्यांना दिलासा, ‘शब्द पाळला’ म्हणत मुख्यमंत्र्यांची घोषणा

पंढरपूर /24 जुलै-आषाढी वारीच्या पावन वातावरणात राज्यातील शेतकर्यांसाठी मोठा दिलासा देणार्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूरातून करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकर्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्ती प्रमाणपत्रे व नव्या पीककर्जाचे धनादेश प्रदान करण्यात आले.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित सुधाकर पंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, विजयकुमार देशमुख, अभिजीतपाटील,उत्तमराव जानकर, नारायणराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, बाजार समितीचे अध्यक्ष हरीश गायकवाड, उपसभापती राजू गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि वारकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संकटात सापडलेल्या शेतकर्यांना कर्जमाफी देण्याचा शब्द राज्य सरकारने पाळला असून, ही देशातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे. राज्यातील 56 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेणार असून, पहिल्या टप्प्यात 17 लाख शेतकर्यांच्या खात्यात 13 हजार कोटी रुपये 31 जुलैपूर्वी जमा केले जाणार आहेत. त्यानंतर बँकांकडून माहिती प्राप्त होताच पुढील याद्या जाहीर केल्या जातील. एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांनाही 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कर्जमाफीचा शुभारंभ राज्याच्या कोणत्याही शहरातून न करता शेतकरी आणि वारकरी यांच्या पवित्र संगमभूमी असलेल्या पंढरपूरातून करण्यामागे विशेष भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, 7.5 हॉर्स पॉवरपर्यंतच्या कृषीपंपांची थकीत वीजबिलेही माफ करण्यात आली असून 50 लाख शेतकर्यांचे तब्बल 48 हजार कोटी रुपयांचे वीजदेयक शासनाने भरले आहे. याशिवाय ठिबक सिंचन, यांत्रिकीकरण, खत अनुदान अशा विविध योजनांवर गतवर्षी 95 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.




