धार भोजशाळा ‘सरस्वती मंदिर’च
हायकोर्टाकडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द

भोपाल/15 मे-मध्य प्रदेशातील इंदूर हायकोर्टाने शुक्रवारी (15 मे) धार भोजशाळा वादावर ऐतिहासिक आणि मोठा निर्णय दिला आहे. धार भोजशाळा मंदिर असल्याचे मानत कोर्टाने तेथे हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. 12 मे रोजी हायकोर्टाने या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला होता.
कोर्टाच्या निकालानंतर, आता शहर काजी वकार सादिक यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करू आणि तो समजून घेऊ, असे म्हणत, या निर्णयाविरोधात मुस्लीम पक्ष सुप्रीम कोर्टात जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
संस्कृत शिक्षणाचे केंद्र आणि देवी सरस्वतीचे मंदिर -निर्णय सुनावणी करण्यापार्वी हायकोर्टाच्या बेंचने सर्वप्रथम या प्रकरणात साहाय्य करणार्या सर्व वकिलांचे आभार मानले. यानंतर, न्यायालय म्हणाले, आम्ही सर्व तथ्ये आणि ’एएसआय’ कायदा बघितला. आर्किओलॉजी हे एक विज्ञान आहे. त्यावर आधारित निष्कर्षांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. याच बरोबर, संविधानाने दिलेले मूलभूत अधिकारही विचारात घेणे आवश्यक आहे. हा परिसर परमार वंशाचे राजा भोज यांच्या काळातील संस्कृत शिक्षणाचे केंद्र होते आणि देवी सरस्वतीचे मंदिर होते.




