… आता मी एकटाच मुंबईला येतोय
जरांगेंचं फडणवीसांना खुले आव्हान

मुंबईला जाण्याचा निर्धार कायम
कदाचित ही शेवटची भेट असेल,आशीर्वाद द्यायला या
मुंबई/14 सप्टेंबर : माझ्या उपोषणाचा आजचा 17 वा दिवस आहे. आता सलाईनही न लावल्यामुळे पोटात पुन्हा आग पडली आहे. मी मुंबईला एकटा जाणार आहे. चार-पाच सहकारी माझ्यासोबत असतील. मला उठून उभे राहता येत नाही. त्यामुळे रस्त्यात सत्काराचे नियोजन करु नका. मला बोलता आलं तर भाषण करेन. पण मला भेटायला येण्यावर बंध नाही. ही शक्यतो शेवटची भेट असेल. त्यामुळे आशीर्वाद द्यायला रस्त्यावर या, पण मुंबईला येऊ नका. शक्यतो ही माझी गोदा पट्ट्याशी आणि महाराष्ट्राशी शेवटची भेट असू शकते, अशी भावनिक साद मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला घातली. ते सोमवारी अंतरवाली सराटीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
आपल्याला मराठा समाजाला हरुन द्यायचे नाही. जिथे देह टेकेन तिथे टेकेन. पण मराठ्यांनी मिश्यांवर ताव मारला पाहिजे इतकं जातिवंत लढायचं. समाजातील लेकरांची मान उंचावली पाहिजे, मेला पण हटला नाही, असे म्हटले पाहिजे. मला असं खितपत पडून मला मरायचं नाही, समाजाला देऊन मरायचं आहे. समाजाची प्रतिष्ठा इंचभरही ढळून द्यायची नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. मी फक्त माझ्याबद्दल नाही तर सगळ्या मराठ्यांबद्दल सांगतो, प्रत्येक घरातील म्हातारा माणूस अभिमानाने म्हणाला पाहिजे, ’असं पोरगं मराठ्यांच्या पोटी जन्माला येते.शेवटच्या श्वासापर्यंत तोंडात हाच शब्द होता, माझ्या समाजाच्या लेकराबाळाला आरक्षण द्या. पळून नाही गेला, छातीवर गोळ्या घेतल्या, पण हलला नाही. पैदा व्हावं तर असं पोरगं व्हावं, अशा भावनिक संवाद जरांगे पाटील यांनी अंतरवालीतील मराठ्यांशी साधला.मला फक्त तुमच्या लेकांसबाळासाठी कोणाला शरण जायचं नाही, झुकायचं नाही कोणापुढे, हे मराठ्यांनी लक्षात घ्या. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या तोडीस तोड ड़ाव टाकायचा आहे. त्यांनी देवी देवतांच्या आडून डाव टाकला होता. मराठ्यांचं खच्चीकरण आणि बदनामी करायची, लोक घुसवून दंगल करायची आणि मग गोळीबार करुन आंदोलन चिरडून टाकायचं, हा त्यांचा डाव आहे, असा सावधानतेचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठ्यांना नेत्यांची कमी नाही, एक नेता नाही तर दुसरा नेता आहे. जो आरक्षण देईल, त्याला निवडून आणायचे. तुमच्या आवडीचा नेता आणि पक्ष असून काही उपयोग नाही. तो तुमच्या लेकरांच कल्याण करणार नाही. मराठे कोणत्याही दिवशी, कोणत्याही क्षणी मुंबई जाम करू शकतात. राजकारणी आणि श्रीमंत मराठे जास्तीत जास्त 25 ते 50 लाख असतील. बाकी साडेपाच कोटी मराठे आहेत, असेही यावेळी मनोज जरांगे यांनी सांगितले.





