दिवाळीच्या गर्दीने रेल्वे गाड्या फुल्ल

मुंबई-पुण्याच्या गाड्यांचे आरक्षण मिळणे कठीण

विशेष गाड्यांमध्येही प्रतीक्षा यादींची संख्या वाढली

अमरावती /12 नोव्हेंबर- दिवाळीचा सण, शाळा-महाविद्यालयांच्या सुट्ट्या आणि गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची वाढती गर्दी यामुळे रेल्वे प्रवासाचे नियोजन कोलमडले आहे. अमरावती, बडनेरा येथून मुंबई, पुणे आणि इतर शहरांकडे जाणार्‍या बहुतांश रेल्वे गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असून अनेक गाड्यांमध्ये प्रतीक्षा यादी 100 ते 150 पर्यंत पोहोचली आहे. नियमित गाड्यांमध्ये जागा मिळत नसल्याने प्रवासी सणासाठी सोडलेल्या विशेष गाड्यांकडे वळत आहेत; मात्र तिथेही आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कुटुंबासह प्रवास करणार्‍या नागरिकांची मोठी अडचण झाली असून, अतिरिक्त रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत नोकरी, व्यवसायासाठी राहणारे अनेक नागरिक आपल्या गावी परतत आहेत. तसेच सण साजरा करून पुन्हा कामावर जाणार्‍या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. याचा थेट परिणाम रेल्वे आरक्षणावर झाला असून शयनयानापासून वातानुकूलित डब्यांपर्यंत जवळपास सर्वच वर्गातील जागा भरल्या आहेत. काही गाड्यांमध्ये आरक्षणासाठी मोठी प्रतीक्षा यादी असल्याने प्रवास निश्चित होणार की नाही, याची चिंता प्रवाशांना सतावत आहे. अमरावतीहून पुण्याला जाणारी अमरावती-पुणे जलदगती रेल्वे (11026) ही प्रवाशांसाठी महत्त्वाची गाडी आहे. मात्र या गाडीत अनेक दिवसांपासून जागा उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे बडनेरा मार्गे धावणार्‍या पुणे-नागपूर गरीब रथ जलदगती रेल्वे (12114/12113) मध्येही आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. अजनी-पुणे वातानुकूलित जलदगती रेल्वे (22124) मध्येही मोठी प्रतीक्षा यादी आहे. गोंदिया-अमरावती-बडनेरा मार्गे पुण्याला जाणारी महाराष्ट्र जलदगती रेल्वे (11040) आणि आझाद हिंद जलदगती रेल्वे (12130) यांमध्येही जागांची मोठी कमतरता जाणवत आहे. नियमित गाड्यांमध्ये जागा न मिळाल्याने प्रवासी तात्काळ आरक्षणाचा पर्याय शोधत आहेत. मात्र त्यासाठीही मोठी धावपळ करावी लागत आहे. दुसरीकडे खासगी बसचे तिकीट महाग असल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे अमरावती-बडनेरा मार्गावरून मुंबई आणि पुण्यासाठी अतिरिक्त सणासुदीच्या विशेष गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. रेल्वे प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन तातडीने अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आह

Back to top button