चित्रा चौक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात

दोन महिन्यांत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता

वलगाव मार्गावरील वाहनचालकांना मोठा दिलासा

अमरावती /12 नोव्हेंबर- चित्रा चौक येथील रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, येत्या 2 महिन्यांत हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या पुलावर अंतिम काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर वलगाव मार्गाने जाणार्‍या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे वलगाव मार्गावरील चारचाकी आणि मोठी वाहने थेट उड्डाणपुलावरून नागपुरी गेटच्या पुढे पोहोचू शकतील. त्यामुळे चित्रा चौकातील वारंवार होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
चित्रा चौकातील या उड्डाणपुलाच्या बांधकामाचे काम सुमारे 8 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. त्यावेळी या प्रकल्पासाठी 60 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, करोनाच्या काळात बांधकामाला मोठा फटका बसला. अनेक दिवस काम बंद राहिल्याने प्रकल्पाला विलंब झाला. त्यातच बांधकामाचा खर्च वाढून 80 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांनी अनेकदा नाराजीही व्यक्त केली होती. दरम्यान, डॉ. सुनील देशमुख यांनी गेल्या वर्षी या उड्डाणपुलाच्या बांधकामासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायालयाने प्रशासनाला 31 डिसेंबर 2025 पूर्वी बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशानंतरही निर्धारित वेळेत काम पूर्ण झाले नाही. उलट जवळपास वर्षभराचा विलंब झाला. आता अंतिम काम सुरू असल्याने पुढील 2 महिन्यांत पूल पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे. अमरावती मंडळाच्या प्रतिनिधींनी या पुलावरून दुचाकींची वाहतूक सुरू झाल्याचे प्रत्यक्ष पाहिले आहे.
काही वाहनचालक कोणतीही भीती न बाळगता पुलावरून दुचाकी चालवत आहेत. दुसरीकडे, चित्रा चौक ते नागपुरी गेटमार्गे भातकुलीकडे जाणार्‍या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याची माहिती आहे. मात्र, उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर वलगाव मार्गावरील वाहनचालकांची मोठी अडचण दूर होणार आहे. तब्बल 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची आशा निर्माण झाल्याने अमरावतीकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिलासा
चित्रा चौक उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी नागरिकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. सुरुवातीला 60 कोटी रुपयांचा अंदाज असलेला खर्च वाढून 80 कोटी रुपयांवर गेल्याची चर्चा आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही कामाला विलंब झाला. आता अंतिम काम सुरू असून, पुढील 2 महिन्यांत पूल सुरू झाल्यास चित्रा चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यासह वलगाव मार्गावरील वाहनचालकांचा वेळही वाचणार आहे.

Back to top button