जिल्हा रुग्णालयातील अपघात कक्षाचे नूतनीकरण रखडले

केवळ 10 खाटांच्या तात्पुरत्या कक्षावर रुग्णांचा भार

गंभीर रुग्णांची गैरसोय वाढली; दिव्यांग तपासणीसाठीही जागेचा प्रश्न

अमरावती/12 नोव्हेंबर – जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात कक्षाच्या नूतनीकरणाचे काम गेल्या 2 महिन्यांपासून रखडल्याने गंभीर रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघातातील जखमी, सर्पदंशाचे रुग्ण, विषारी पदार्थांचे सेवन केलेले रुग्ण तसेच गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना सध्या केवळ 10 खाटांच्या तात्पुरत्या कक्षात उपचार घ्यावे लागत आहेत. त्यातच दिव्यांग तपासणी मंडळासाठीही पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने रुग्णालयातील आरोग्यसेवेवर ताण वाढला आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून जुन्या अपघात कक्षाची डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा नूतनीकरणाचे काम सुरू झाल्याने आधीच्या खर्चावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. रस्ते अपघातात जखमी झालेले, सर्पदंश झालेले, विषारी पदार्थांचे सेवन केलेले आणि गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना सर्वप्रथम अपघात कक्षात दाखल केले जाते. येथे तातडीचे उपचार देऊन रुग्णांची प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या कक्षाला रुग्णालयात विशेष महत्त्व आहे. मात्र, नूतनीकरणाच्या कामामुळे हा कक्ष तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग तपासणी कक्षात हलविण्यात आला आहे. तेथे केवळ 10 खाटा असल्याने रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत सुविधा अपुर्‍या पडत आहेत. चोवीस तास रुग्णांची ये-जा सुरू असल्याने खाटांसाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. विशेष म्हणजे, सुमारे 5 ते 6 महिन्यांपूर्वी जुन्या अपघात कक्षात रंगरंगोटी आणि किरकोळ दुरुस्ती करण्यात आली होती. त्यासाठी लाखो रुपये खर्च झाल्याची चर्चा आहे. मात्र, काही महिन्यांतच पुन्हा नूतनीकरणाचे काम सुरू झाल्याने आधीच्या कामाचे नियोजन आणि खर्चाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. हे काम नेमके कधी पूर्ण होणार, याकडे रुग्णांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी रुग्णालयात तपासणी मंडळ आयोजित केले जाते. नूतनीकरणाच्या कामामुळे काही काळापूर्वी अपघात कक्षातच ही तपासणी केली जात होती. मात्र, बांधकाम वाढल्याने आता रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ डॉक्टरांना तपासणी करावी लागत आहे. मर्यादित जागा, अस्वच्छता आणि अव्यवस्थेमुळे डॉक्टरांनीही नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे गंभीर रुग्णांना पुरेशा खाटा मिळत नाहीत, तर दुसरीकडे दिव्यांगांची तपासणीही गैरसोयीत होत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने नूतनीकरणाचे काम लवकर पूर्ण करून दोन्ही सेवांसाठी स्वतंत्र आणि पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button