अमरावती-मुंबई विमान प्रवासाचे भाडे 4 हजारावरून 12 हजारांवर

दिवाळीच्या गर्दीने विमानभाड्यात मोठी वाढ

15 नोव्हेंबरचे तिकीट 12 हजार 600 रुपये

अमरावती/12 नोव्हेंबर – दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने अमरावती-मुंबई विमान प्रवास चांगलाच महागला आहे. सामान्य दिवसांत 4 ते 5 हजार रुपये असणारे विमानभाडे आता 12 हजार रुपयांच्या पुढे गेले असून, 15 नोव्हेंबरच्या प्रवासासाठी एका तिकिटाचा दर तब्बल 12 हजार 600 रुपयांवर पोहोचला आहे. तर 13 नोव्हेंबरला काही जागांचे दर 17 हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. दुसरीकडे 16 नोव्हेंबरला हाच प्रवास अवघ्या 4 हजार 82 रुपयांत करता येणार असल्याने तारखेनुसार भाड्यात मोठी तफावत दिसत आहे.
अमरावतीतील बेलोरा विमानतळावरून मुंबईसाठी आठवड्यातून रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे केवळ 4 दिवस विमानसेवा उपलब्ध आहे. गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मुंबईला जाणार्‍यांची संख्या वाढल्याने तिकिटांचे दरही वाढले आहेत. ऑनलाइन आरक्षणाच्या माहितीनुसार, 11 नोव्हेंबरला विमानभाडे 10 हजार 500 रुपये होते. 13 नोव्हेंबरलाही सुरुवातीचे भाडे 10 हजार 500 रुपये असले तरी मोजक्या जागा शिल्लक असल्याने इतर जागांचे दर 17 हजारांपर्यंत गेले आहेत. 15 नोव्हेंबरला 12 हजार 600 रुपये, तर 16 नोव्हेंबरला 4 हजार 82 रुपये भाडे दाखविण्यात येत आहे. मुंबईहून अमरावतीला येणार्‍या विमानाचे भाडे तुलनेने कमी आहे. वाढत्या भाड्यामुळे नोकरदार, व्यावसायिक आणि तातडीच्या कामासाठी प्रवास करणार्‍या नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मर्यादित विमानसेवा आणि सणासुदीच्या काळातील वाढती मागणी यामुळे प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

विमानभाड्यात तारखेनुसार मोठी तफावत

सामान्य दिवसांत अमरावती-मुंबई विमान प्रवासासाठी 4 ते 5 हजार रुपये मोजावे लागतात. मात्र, दिवाळीच्या काळात हेच भाडे 17 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. 15 नोव्हेंबरला 12 हजार 600 रुपये, तर 16 नोव्हेंबरला केवळ 4 हजार 82 रुपये भाडे आहे. त्यामुळे प्रवासाच्या तारखेनुसार तिकिटांच्या दरात मोठा फरक पडत असून प्रवाशांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे.

Back to top button