डॉक्टर भोजने दाम्पत्याला 16 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपींना न्यायालयात केले हजर

चौकशीतून मोठे धागेदोरे उघड होण्याची शक्यता
अमरावती /12 नोव्हेंबर- बाळ विक्रीच्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या डॉ. वैशाली भोजने, प्रफुल्ल भोजने या दाम्पत्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने 16 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकारामागील मुख्य सूत्रधार आणि संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी फ्रेजरपुरा पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असून अनेक मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहरात खळबळ उडवून देणार्या बाळ विक्रीच्या गुन्ह्यात फ्रेजरपुरा पोलिसांनी धडक कारवाई करत डॉ. वैशाली भोजने, प्रफुल्ल भोजने या दाम्पत्याला ताब्यात घेतले होते. या दोन्ही आरोपींना आज कडक बंदोबस्तात अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश भट्टाचार्य यांच्या न्यायालयासमोर पार पडली. सुनावणीदरम्यान तपास यंत्रणेने या गुन्ह्याचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकाराचा सखोल तपास करण्यासाठी आणि दोन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची आग्रही मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन न्यायालयाने या दाम्पत्याला 16 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या संतापजनक बाळ विक्रीच्या प्रकारात या दाम्पत्याची नेमकी भूमिका काय होती आणि त्यांनी हे कृत्य का केले याचा शोध घेतला जात आहे. या संपूर्ण प्रकारामागील मुख्य साखळी समोर आणण्याचे मोठे आव्हान आता फ्रेजरपुरा पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
तपासातून उलगडणार नवजात बाळ विक्रीची संपूर्ण साखळी
बाळ विक्री प्रकरणाचा मुळापासून छडा लावण्यासाठी पोलिसांना मिळालेली कोठडी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या तपासातून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सहभागी असणार्या इतर संशयितांची नावे निष्पन्न होणार. संबंधित सर्व बाबींची सखोल पडताळणी होऊन या प्रकाराची संपूर्ण साखळी उघडकीस येणार.
पोलीस कोठडीतील चौकशीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
पोलीस कोठडीच्या या कालावधीत होणार्या चौकशीतून या प्रकरणाचे आणखी कोणते धक्कादायक धागेदोरे समोर येतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या कारवाईमुळे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.





