वृद्ध महिलेची 52 हजारांची साखळी लंपास
नातेवाइकांची ओळख सांगून भामट्याने साधला डाव

गोपालनगरच्या डीमार्ट समोरील घटना
अमरावती /5 नोव्हेंबर- नातेवाइकांची ओळख असल्याचे सांगून एका भामट्याने 68 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील 52 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केली. गोपालनगर येथील डी-मार्टजवळ बुधवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318 (4) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला गोपालनगर येथील सुपर टाईल्सजवळून एकटीच पायी जात होती. यावेळी लाल रंगाच्या दुचाकीवर आलेल्या सुमारे 40 वर्षीय अनोळखी व्यक्तीने तिला थांबविले. नातेवाइकांना ओळखत असल्याचे सांगून त्याने महिलेला दुचाकीवर बसविले. त्यानंतर साईनगर चौकातील एमआरएफ टायर दुकानाजवळ नेले. तेथे आरोपीने महिलेला आई म्हणून हाक मारली आणि गळ्यातील सोन्याची साखळी सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने मागितली. दागिना परत देण्याचे आश्वासन दिल्याने महिलेने साखळी त्याच्याकडे दिली. मात्र, साखळी हातात पडताच आरोपी दुचाकीवरून पसार झाला. बराच वेळ वाट पाहूनही तो परत न आल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.





