मुथूट फिनकॉर्प घोटाळ्या प्रकरणी चौघांविरुध्द चार्जशीट दाखल
तीन महिन्यानंतरही सोन्याचा आणि रोकडचा आकडा अस्पष्ट

नातेवाईकांच्या नावावर खरेदी केलेल्या मालमत्तांची चौकशी
ग्राहकांच्या विविध तक्रारीची दखल
अमरावती/5 नोव्हेंबर – शहरातील विमको टॉवर परिसरातील मुथूट फिनकॉर्प शाखेत उघडकीस आलेल्या सोने आणि रोकड अपहार प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन जवळपास 3 महिने उलटले तरी या प्रकरणातील एकूण आर्थिक गैरव्यवहाराचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. ग्राहकांचे किती सोने गायब झाले, किती रोकड हडप करण्यात आली आणि कंपनीचे नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, याचा ठोस हिशेब समोर आलेला नाही. कंपनीचा अंतिम लेखापरीक्षण अहवाल पोलिसांना मिळालेला नसल्याने तपासातील महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित आहेत. दुसरीकडे, आरोपी आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नावावर खरेदी केलेल्या मालमत्तांचीही पोलिसांकडून तपासणी सुरू आहे.
विमको टॉवरमधील मुथूट फिनकॉर्प शाखेत ग्राहकांच्या तारण ठेवलेल्या सोन्यात आणि जमा केलेल्या रकमेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार सुरुवातीला एका महिला ग्राहकाने केली होती. त्यानंतर आणखी काही ग्राहकांनीही आपले सोने आणि जमा रकमेबाबत तक्रारी केल्या. हळूहळू तक्रारदारांची संख्या वाढत गेली. पोलिसांनी प्रत्येक तक्रारीच्या आधारे स्वतंत्र गुन्हे दाखल केले. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढत गेली. मात्र, सर्व तक्रारी एकत्रित केल्यानंतर किती ग्राहकांचे सोने प्रभावित झाले आणि त्याची बाजारभावानुसार एकूण किंमत किती होते, याची निश्चित माहिती अद्याप उपलब्ध नाही. कंपनीच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेला अंतिम लेखापरीक्षण अहवाल पोलिसांना मिळालेला नाही. त्यामुळे शाखेतील सोन्याचा प्रत्यक्ष साठा, तारण ठेवलेले सोने आणि रोकड यांचा ताळमेळ अद्याप बसलेला नाही. तपासादरम्यान आरोपी आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नावावर काही मालमत्ता खरेदी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संबंधित मालमत्तांची कागदपत्रे जप्त करून काही मालमत्ता सील करण्यात आल्या. या मालमत्ता खरेदीसाठी वापरलेला पैसा कथित गैरव्यवहारातून आला होता की अन्य मार्गाने मिळवला होता, याचीही चौकशी सुरू आहे. चार आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल झाल्याने तपासात पुढचे पाऊल पडले असले, तरी घोटाळ्याची एकूण रक्कम, गायब सोन्याचे वजन आणि कंपनीचे प्रत्यक्ष नुकसान हे महत्त्वाचे प्रश्न अजूनही कायम आहेत. आता कंपनीचा अंतिम लेखापरीक्षण अहवाल मिळाल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचे आर्थिक चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.





