दिवाळी खरेदीत वाहतूक कोंडीचा विळखा
अतिक्रमण आणि बेशिस्त वाहनतळामुळे नागरिक त्रस्त

बंद उड्डाणपुलाचा व्यापार्यांनाही मोठा फटका
अमरावती/5 नोव्हेंबर – दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत असतानाच शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. जयस्तंभ चौक ते जवाहर गेट, चित्रा चौक आणि श्याम चौक परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून पायी चालणेही कठीण झाले आहे. अतिक्रमण, हातगाड्या, बेशिस्त वाहनतळ आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे ग्राहकांसह व्यापारीही त्रस्त झाले आहेत. राजकमल चौकातील उड्डाणपूल दीड वर्षापासून बंद असल्याने शहरातील व्यापारावरही परिणाम होत आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी सायंकाळी मोठ्या संख्येने नागरिक बाजारात येतात. जयस्तंभ चौक ते जवाहर गेट मार्गावरील अडथळ्यांमुळे एका वेळी केवळ 1 ते 2 दुचाकीच पुढे जाऊ शकतात. रस्त्याच्या कडेला हातगाड्या आणि तात्पुरती दुकाने लागल्याने वाहनतळाची जागाही उरत नाही. त्यामुळे अनेक ग्राहक खरेदी न करताच परत जात आहेत. जवाहर गेट, चित्रा चौक आणि श्याम चौक परिसरात चुकीच्या दिशेने येणारी वाहने आणि बेशिस्त वाहनतळामुळे कोंडीत भर पडत आहे. याचा महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. महानगर चेंबरचे सचिव घनश्याम राठी यांनी अनेक वर्षांपासून वाहतूक सुधारणांसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मात्र, ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. अमरावती होलसेल पेन, शुगर व किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांनीही हातगाड्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. हमालपुरा, रुक्मिणीनगर आणि सायन्सकोर मैदान परिसरातील व्यापारालाही उड्डाणपूल बंदचा फटका बसत आहे. प्रशासनाने अतिक्रमणे हटवून वाहनतळ आणि वाहतूक नियोजन करावे, अशी मागणी व्यापार्यांनी केली आहे.





