खासगी बसचालकांच्या मनमानीला आरटीओचा लगाम
दिवाळीत प्रवाशांच्या लुटीला बसणार चाप

अवाजवी भाडे वसुलीवर सहा पथकांची नजर
अमरावती /5 नोव्हेंबर- दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गावाकडे जाणार्या प्रवाशांची संख्या वाढत असताना खासगी प्रवासी बसचालकांकडून अवाजवी भाडे आकारण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रवाशांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने कडक पावले उचलली असून, एसटी महामंडळाने ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा जास्तीत जास्त 50 टक्के अतिरिक्त भाडे घेण्याचीच परवानगी खासगी बसचालकांना आहे. त्यापेक्षा अधिक भाडे आकारल्यास संबंधित बसचालकांवर कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्यासाठी आरटीओने सहा भरारी पथके तैनात केली आहेत.
दिवाळीच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक आपल्या गावी आणि इतर शहरांत प्रवास करतात. याच गर्दीचा फायदा घेत काही खासगी बसचालक मनमानी पद्धतीने भाडेवाढ करतात. प्रवाशांची गरज आणि प्रवासाची निकड लक्षात घेऊन अवाजवी पैसे वसूल केले जात असल्याच्या तक्रारी विभागाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने निश्चित केलेल्या भाड्यापेक्षा 50 टक्क्यांपर्यंतच अधिक भाडे घेता येईल, असे आरटीओने स्पष्ट केले आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. आरटीओच्या भरारी पथकांनी मागील आठवडाभरात 105 खासगी प्रवासी आणि शालेय बसची तपासणी केली. यामध्ये तब्बल 71 बसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या.
अवाजवी भाडे आकारणार्या 5 बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान वाहून नेणार्या 35 बसवरही दंड आकारण्यात आला. या कारवाईत एकूण 71 बसमधून 5 लाख 51 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. केवळ जादा भाडे वसुलीवरच विभागाचे लक्ष नसून खासगी प्रवासी बसमधून नियमबाह्य पद्धतीने व्यावसायिक मालाची वाहतूक करणार्यांवरही नजर ठेवली जाणार आहे. बसची परवानगी, योग्यता प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे वैध नसल्यास संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल. त्यामुळे दिवाळीच्या गर्दीत प्रवाशांची आर्थिक लूट करणार्या खासगी बसचालकांना आता नियमांचे पालन करावे लागणार आहे.
प्रवाशांनी भाडेवाढीबाबत जागरूक राहावे
एसटी महामंडळाच्या निश्चित भाड्यापेक्षा जास्तीत जास्त 50 टक्के अतिरिक्त भाडे आकारण्याचीच खासगी बसचालकांना मुभा आहे. त्यापेक्षा अधिक पैसे मागितल्यास प्रवाशांनी तक्रार करावी. अवाजवी भाडे, नियमबाह्य मालवाहतूक आणि कागदपत्रांतील त्रुटींवर आरटीओ कारवाई करणार आहे. यासाठी सहा भरारी पथके तैनात केली असून, प्रवाशांच्या तक्रारींची तातडीने दखल घेतली जाणार आहे.





