समृद्धी महामार्गावर 15 पोलीस मदत केंद्र उभारणार

43 कोटीचा निधी मंजूर

अमरावती/5 नोव्हेंबर – नागपूर ते मुंबईदरम्यानच्या समृद्धी महामार्गावर वाढती वाहनांची संख्या आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना तातडीने मदत मिळावी, यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महामार्गावर 15 नवीन महामार्ग पोलीस मदत केंद्रे आणि स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून, त्यासाठी 43.47 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या केंद्रांच्या कामकाजासाठी महाराष्ट्र पोलीस दलात 420 नवीन पदे निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर असून, या मार्गावर कमी वेळेत वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या दररोज सरासरी 50 हजार वाहने या महामार्गावरून धावत आहेत. वाढत्या वाहतुकीमुळे अपघात, लुटमारीच्या घटना तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाच्या प्रस्तावानुसार गृह विभागाने 15 महामार्ग पोलीस मदत केंद्रे आणि स्वतंत्र नियंत्रण कक्षाला मंजुरी दिली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पोलीस महासंचालकांच्या प्रस्तावावर चर्चा करून नवीन पोलीस मदत केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेसाठी एकरकमी 43.47 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. नव्या केंद्रांमुळे महामार्गावर पोलीस कर्मचारी कायम तैनात राहतील. विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील जंगल परिसरात होणार्‍या लुटमारीच्या घटनांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. अपघात किंवा अन्य आपत्कालीन प्रसंगी मदत लवकर पोहोचविण्यासही या व्यवस्थेचा फायदा होणार आहे.

महामार्गावरील वाढत्या वाहतुकीचे आव्हान

701 किलोमीटरच्या महामार्गावर दररोज 50 हजार वाहनांची वर्दळ असून, अपघात आणि लुटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी 15 मदत केंद्रे उभारली जाणार आहेत. यासाठी 420 नवीन पोलीस पदे निर्माण होणार असून, 43.47 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. स्वतंत्र नियंत्रण कक्षामुळे मदतकार्य अधिक जलद होण्यास मदत मिळणार आहे.

Back to top button