अमरावतीत फटाका बाजारासाठी तीन ठिकाणी अधिकृत परवानगी

सायन्सकोरमध्ये 50 दुकानांना परवानगी, गाडगेनगरमध्ये 20 तर बडनेरामध्ये 35 दुकाने

अमरावती/5 नोव्हेंबर – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील फटाका बाजाराचा मार्ग मोकळा झाला असून, सायन्सकोर, गाडगेनगर आणि बडनेरा या 3 ठिकाणी फटाक्यांची दुकाने थाटण्याची तयारी पूर्ण झाली आहे. परवान्यांच्या नूतनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, सायन्सकोर येथे 50, गाडगेनगर येथे 20 आणि बडनेरा येथे 35 दुकानांना परवानगी देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या एक-दोन दिवसांत संबंधित विक्रेत्यांना परवान्यांचे नूतनीकरण करून दिले जाणार असल्याची माहिती चिल्लर फटाका विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राजू उंबरकर आणि सचिव राहुल पवार यांनी दिली.
यंदा फटाक्यांच्या विक्रीवर न्यायालयीन निर्बंध आणि ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे सावट असल्याने विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मुंबईत यासंदर्भात न्यायालयीन पातळीवर चर्चा सुरू असतानाच नागपूर खंडपीठानेही फटाक्यांच्या आवाजाबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अमरावतीतील शेकडो विक्रेत्यांचे लक्ष परवाना नूतनीकरणाकडे लागले होते. मात्र, पोलिसांकडून आवश्यक परवानगीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुमारे 250 फटाका विक्रेत्यांकडे परवाने आहेत. यापैकी अनेक परवान्यांचे दर 12 महिन्यांनी नूतनीकरण केले जाते. यंदाही त्यासाठीची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, नागपूरमध्ये फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा 120 डेसिबलवरून 55 डेसिबलपर्यंत कमी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. तसेच निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणार्‍या फटाक्यांच्या विक्रीला आळा घालण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत फटाका बाजारात विक्रीसोबतच नियमांच्या पालनावरही प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.

Back to top button