क्रिप्टो फसवणूक प्रकरणात पांडे कुटुंबाचा जामीन फेटाळला
69 लाखांच्या फसवणूक प्रकरणात कारवाई

काटोले आणि सोनटक्के यांनाही न्यायालयाचा दणका
अमरावती/5 नोव्हेंबर – क्रिप्टो चलन आणि परकीय चलनातील गुंतवणुकीतून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 10 गुंतवणूकदारांची तब्बल 69 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपींना मोठा दणका दिला आहे. या प्रकरणातील पांडे कुटुंबाच्या सदस्यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले असून संगीता काटोले आणि मनोज सोनटक्के यांचे अटकपूर्व जामीन अर्जही नामंजूर करण्यात आले आहेत.
त्यामुळे या आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपींच्या अडचणी वाढल्या असून पुढील पोलीस तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अनुप्रीती ढवळे यांनी बाजू मांडली, तर तक्रारदारांतर्फे अॅड. अनिरुद्ध लढ्ढा यांनी युक्तिवाद केला.
या प्रकरणाची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. क्रिप्टो व्यवहार, परकीय चलनातील गुंतवणूक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे उकळण्यात आल्याचा आरोप आहे. गुंतवणूक केल्यास दरमहा 5 ते 7 टक्के नफा मिळेल, तसेच 6 महिन्यांनंतर गुंतवलेली मूळ रक्कम परत केली जाईल, असे आश्वासन गुंतवणूकदारांना देण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांना नफ्याची रक्कम नियमितपणे देण्यात आली. त्यामुळे संबंधित योजनेवर अनेकांचा विश्वास बसला. याच विश्वासातून गुंतवणूकदारांनी आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना आणि परिचितांनाही पैसे गुंतविण्यास प्रोत्साहित केले. परिणामी, या गुंतवणुकीचा विस्तार वाढत गेला. मात्र, काही काळानंतर गुंतवणूकदारांना मिळणारा परतावा बंद झाला. पैसे मागितल्यानंतर तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, दिलीप कृष्णा भिल यांच्यासह एकूण 10 जणांनी या योजनेत 69 लाख 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. ठरलेल्या मुदतीत पैसे परत न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, 90 दिवसांत रक्कम परत करण्याचे आश्वासनही पूर्ण झाले नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे अखेर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणात शारदा सुनील पांडे, सुनील पांडे, संजोग पांडे, मनोज सोनटक्के, प्रेमा सोनटक्के, संगीता काटोले, लविष चौधरी ऊर्फ नवाब अली, प्रमोद प्रजापती आणि अमीर खान यांची नावे तक्रारीत नमूद आहेत. न्यायालयात जामीन अर्जांवर सुनावणी झाली असता सरकारी पक्षाने आपली बाजू प्रभावीपणे मांडली. त्यानंतर पांडे कुटुंबातील सदस्यांचे जामीन अर्ज तसेच संगीता काटोले आणि मनोज सोनटक्के यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले. या निर्णयामुळे प्रकरणातील आरोपींच्या अडचणी वाढल्या असून गुंतवणूकदारांचे पैसे नेमके कुठे गेले, या आर्थिक व्यवहारांची साखळी काय होती आणि फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतच्या पुढील पोलीस तपासाकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.





