रात्री टाकलेला नालीवरील स्लॅब; काही तासांतच कोसळल्याने खळबळ

महानगरपालिकेचा अजब कारभार!

बडनेरा, प्रभाग 22 मधील रखडलेल्या कामाचा दर्जा उघड
अभियंता तांबेकर यांचे अनभिज्ञतेचे धक्कादायक उत्तर

बडनेरा / 27 नोव्हेंबर- प्रभाग क्रमांक 22 मध्ये वर्षानुवर्षे रखडलेल्या नालीवरील झाकण लादीचे काम रात्री 11 वाजता उरकण्याचा प्रताप कंत्राटदाराने केला आणि अवघ्या काही तासांतच ते निकृष्ट बांधकाम कोसळून पडल्याने महापालिकेच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. विशेष म्हणजे या गंभीर प्रकाराची साधी कल्पनाही नसल्याचे उत्तर संबंधित अभियंता तांबेकर यांनी दिल्याने कामाच्या दर्जावर आणि अधिकार्‍यांच्या देखरेखीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिक नालीवरील झाकण लादीच्या कामाची वाट पाहत होते. अखेर या कामाला मुहूर्त लागला खरा पण कंत्राटदाराने दिवसाउजेडी काम करण्याऐवजी रात्री 11 वाजताच्या सुमारास घाईघाईत बांधकाम सुरू केले. रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेचा कोणताही अधिकारी तिथे हजर नव्हता. काम पूर्ण होऊन काही तास उलटत नाहीत तोच ही नव्याने टाकलेली लादी पत्त्यासारखी कोसळून खाली पडली. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच परिसरातील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली.
रात्री उशिरा काम करताना सिमेंट आणि वाळूचे प्रमाण योग्य वापरले होते का आणि साहित्याची गुणवत्ता तपासली गेली होती का असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. या गंभीर प्रकाराबाबत अभियंता तांबेकर यांना विचारले असता रात्री 11 वाजता काम सुरू झाल्याचे आणि काही तासांतच बांधकाम कोसळल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावर या गोष्टीची मला कोणतीही कल्पना नाही असे धक्कादायक उत्तर अभियंता तांबेकर यांनी दिले. एकीकडे जनतेच्या पैशांचा असा चुराडा होत असताना जबाबदार अभियंत्यांनाच कामाची माहिती नसणे हा महापालिकेचा अजब कारभार चव्हाट्यावर आणणारा प्रकार ठरला आहे. कोसळलेल्या बांधकामामुळे परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

मलिदा लाटण्याचा डाव आणि कारवाईची मागणी
अनेक वर्षे काम रखडवून ठेवायचे आणि नंतर रात्रीच्या अंधारात निकृष्ट दर्जाचे काम उरकून निधी लाटायचा असा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून निकृष्ट काम करणार्‍या कंत्राटदाराचे देयक थांबवावे तसेच जबाबदार अधिकार्‍यांवर आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी बडनेरा प्रभाग क्रमांक 22 मधील रहिवाशांनी केली आहे.

Back to top button