रहाटगाव स्मशानभूमीतील अतिक्रमण हटविण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

आपली मातृभूमीच्या वृत्ताची प्रशासनाकडून तातडीने दखल

12 गुंठे जागेवरील अतिक्रमण तत्काळ पाडावे

महानगरपालिकेने विकासकामे सुरू करावीत

अमरावती /27 नोव्हेंबर- रहाटगाव जुनी वस्ती परिसरातील हिंदू स्मशानभूमीच्या जागेवरील वाद आणि तिथल्या समस्यांबाबत दैनिक आपली मातृभूमी वृत्तपत्राने 30 ऑक्टोबर 2026 रोजी पुन्हा सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत स्मशानभूमीच्या जागेवरील 12 गुंठे अतिक्रमण तात्काळ हटवून तिथल्या हद्दी निश्चित कराव्यात व विकासकामे सुरू करावीत असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी अमरावती महानगरपालिकेला दिले आहेत.
रहाटगाव जुनी वस्ती भागात 1926 पासून हिंदू स्मशानभूमी अस्तित्वात आहे. पण या ठिकाणी मूलभूत सुविधा नसल्याने व अतिक्रमण वाढल्याने नागरिकांना अंत्यसंस्कार करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. या स्मशानभूमीचा विकास व्हावा यासाठी चंद्रशेखर गोविंदगिरी गिरी आणि सुभाष भीमरावजी चौधरी यांनी प्रशासनाकडे सातत्याने निवेदने दिली होती. तसेच चंद्रशेखर गोविंदगिरी गिरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकाही दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर आणि दैनिक आपली मातृभूमीने वेळोवेळी मांडलेल्या या समस्येनंतर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या स्तरावर तसेच पालकमंत्र्यांसमवेत बैठका व सुनावणी घेण्यात आली.
प्रशासनाने केलेल्या पाहणीत जुनी वस्ती रहाटगाव येथील सर्व्हे क्रमांक 9 मधील 0.90 हेक्टर शासकीय जागेवर विविध बाबी आढळून आल्या आहेत. यात महापालिकेची शाळा आणि स्मशानभूमीचे चार ओटे तसेच उत्तरेस दांडेश्वर संस्थान मंदिर आणि पूर्वेस जुने शिवमंदिर आणि पश्चिमेस पाताळेश्वर मंदिर व नाला आहे. याच गटाच्या दक्षिण बाजूला सर्व्हे क्रमांक 12 च्या वहिवाटदारांनी अंदाजे 12 गुंठे जागेवर अतिक्रमण केल्याचे उघड झाले आहे. ही संपूर्ण जागा 1992 पासून अमरावती महापालिकेकडे सोपवलेली आहे.
नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेने सर्व्हे क्रमांक 9 मधील 12 गुंठे अतिक्रमण त्वरित जमीनदोस्त करावे असे आदेशात म्हटले आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर विकास आराखड्यातील रस्ता व सर्व्हे क्रमांक 12 च्या हद्दीमधील मोकळी जागा स्मशानभूमीसाठी वापरता येईल. किंवा प्रस्तावित रस्ता दक्षिण हद्दीवरून नेल्यास उत्तरेकडील जागा अंत्यविधीसाठी उपलब्ध होऊ शकते. या दोन पर्यायांपैकी सोयीचा पर्याय निवडून महापालिकेने हद्दी पक्क्या कराव्यात आणि विकासकामांसाठी निधीची तरतूद करावी असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. आपली मातृभूमीच्या वृत्ताची प्रशासनाने घेतलेली ही दखल शहरभर चर्चेचा विषय ठरली आहे.

उच्च न्यायालयाकडून महापालिका आयुक्तांना हजर राहण्याचे फर्मान
उच्च न्यायालयाकडून महापालिका आयुक्तांना हजर राहण्याचे फर्मान रहाटगाव जुनी वस्ती परिसरातील स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटवून विकासकामे करण्याबाबत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी 26 ऑक्टोबर 2026 रोजी योग्य तो आदेश पारित करून उच्च न्यायालयाची अवमानना टाळली आहे. मात्र या प्रकरणात अमरावती महानगरपालिकेची भूमिका प्रलंबित असल्याने उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्त मंगेश गोंदावले यांना नोटीस बजावली आहे. तसेच पुढील सुनावणीसाठी 7 जानेवारी 2027 रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करणार असून आयुक्त साहेब काय भूमिका घेतात यावर आमच्यासह समस्त नागरिकांचे लक्ष लागले आहेत.
– डॉ. चंद्रशेखर गिरी,
याचिकाकर्ते (रहाटगांव) अमरावती

Back to top button