मेळघाटात राज्यमंत्र्यांचा सरप्राईज दौरा
भेटी नंतर मुख्याध्यापकांची ’एन्ट्री’, प्रशासकीय भोंगळ कारभार चव्हाट्यावर!

चिखलदरा/22 नोव्हेंबर: मेळघाट दौर्यावर असलेल्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शुक्रवारी सकाळी डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेला अचानक भेट देऊन प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच भंबेरी उडवली. सकाळी 10.45 वाजता राज्यमंत्र्यांचा ताफा शाळेच्या आवारात धडकला, मात्र खुद्द शाळेचे मुख्याध्यापकच जागेवर नसल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, राज्यमंत्र्यांनी संपूर्ण शाळेची पाहणी आटोपून त्या परतीच्या प्रवासाला निघण्याच्या बेतात असतानाच महाशय मुख्याध्यापकांनी शाळेत ’एन्ट्री’ केली. या प्रकारामुळे मेळघाटातील शासकीय आश्रमशाळांमधील शिस्तीचा बोजवारा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून संपूर्ण परिसरात या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मेळघाट दौर्यानिमित्त सर्वच विभागांचे अधिकारी व कर्मचारी धास्तावलेले होते. शुक्रवारी सकाळी ठीक 10.45 वाजता राज्यमंत्र्यांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेला धडक दिली. यावेळी शाळेतील कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या सुविधांची त्यांनी पाहणी केली. परंतु, शाळेचे प्रमुख असलेले मुख्याध्यापकच गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. राज्यमंत्र्यांची पाहणी पूर्ण होऊन त्या परत निघण्याच्या तयारीत
असतानाच मुख्याध्यापक घाईघाईने शाळेत हजर झाले. या उशिरा झालेल्या आगमनाची मेळघाटात चांगलीच खमंग चर्चा सुरू आहे.
पाच खात्यांचा भार; अधिकार्यांची तारांबळ- केवळ आश्रमशाळेचे मुख्याध्यापकच नव्हे, तर ’मेडा’च्या अधिकार्यांनीही अशाच प्रकारे उशिरा हजेरी लावत हाच कित्ता गिरवला. राज्यमंत्री बोर्डीकर यांच्याकडे तब्बल पाच महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार असल्याने, केवळ एका विभागापुरते मर्यादित न राहता सर्वच विभागांच्या अधिकार्यांना दौर्यात हजर राहणे भाग पडले. मंत्र्यांच्या अचानक भेटीच्या धास्तीने सर्वच शासकीय कार्यालयांत वेळेवर पोहोचण्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांची मोठी लगबग पाहायला मिळाली.
कारवाईच्या प्रतीक्षेत मेळघाट- दौर्याच्या पहिल्या दिवशी राज्यमंत्री बोर्डीकर यांनी अधिकारी आणि कर्मचार्यांच्या उशिरा येण्याबाबत किंवा गैरहजेरीबाबत कोणतेही जाहीर भाष्य केले नाही. त्यामुळे त्यावेळी तरी अधिकार्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि वातावरण काहीसे हलकेफुलके राहिले. मात्र, मंत्र्यांनी हा प्रकार गांभीर्याने टिपला असून त्या मुंबईत परतल्यानंतर या बेशिस्त अधिकारी आणि मुख्याध्यापकांची नोंद घेऊन कारवाईचा बडगा उगारणार का, अशी कुजबुज आता मेळघाटच्या प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे.





