फ्रेजरपुरा परिसरात घातक शस्त्रांसह दोघांना अटक

गुन्हे शाखेच्या गस्तीमुळे मोठा अनर्थ टळला

तडीपार गुंडासह दोघांवर फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हे

अमरावती/22 नोव्हेंबर – शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घातक शस्त्रे घेऊन गुन्हा करण्याच्या तयारीत फिरणार्‍या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत एका तडीपार गुंडाचाही समावेश असून पोलिसांनी दोघांचीही धरपकड करत पुढील कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे.
अमरावती गुन्हे शाखेचे पथक नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना मालटेकडी परिसरात पंचशील नगर येथील 20 वर्षीय तडीपार गुंड सुदर्शन अवधूत शेंडे हा घातक शस्त्रासह संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला तात्काळ घेराव घालून ताब्यात घेतले. त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमांसह शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याच मोहिमेदरम्यान पंचशील नगर येथीलच 20 वर्षीय प्रणिश उर्फ पंच्या प्रमोद खडसे हा देखील घातक शस्त्र बाळगून दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकत त्याच्याविरुद्धही शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

Back to top button