पाण्याच्या शोधात शेतकरी होताहेत कर्जबाजारी

बोअरवेल व्यावसायिकांकडून मनमानी दर : मोरेश्वर वानखडे यांचा आरोप

वरुड / 18 नोव्हेंबर- परिसरात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पावसाअभावी फळबागा वाचविण्यासाठी शेतकर्‍यांना पाण्याचा शोध घ्यावा लागत असून, त्यासाठी बोअरवेल खोदकामाचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. मात्र, याच परिस्थितीचा फायदा घेत बोअरवेल खोदकाम करणार्‍या व्यावसायिकांकडून मनमानी दर आकारले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
वरूड तालुक्यासह परिसरातील विविध भागांत बोअरवेल खोदकामाचे दर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे असल्याचे चित्र आहे. लेहगाव, मोर्शी परिसरात प्रतिफूट 140 ते 150 रुपये तर नरखेड, मोवाड, काटोल तसेच चांदूरबाजार व परतवाडा परिसरातही साधारणतः 140 ते 150 रुपये प्रतिफूट दर असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, वरुड परिसरात काही ठिकाणी बोअरवेल खोदकामासाठी तब्बल 500 रुपये प्रतिफूट दर आकारला जात असल्याची बाब समोर आल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आधीच दुष्काळामुळे संत्रा व मोसंबीच्या बागा वाचविण्यासाठी शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. पाणी मिळिवण्यासाठी बोअरवेल खोदणे ही त्यांची गरज बनली आहे. मात्र, खोदकामाच्या दरांमध्ये एवढी मोठी तफावत असल्यास त्याचा थेट आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे. पाण्याच्या शोधात शेतकर्‍यांना कर्ज काढावे लागत असून, बोअरवेल खोदकामाचा खर्चही आवाक्याबाहेर जात असल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होत आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वरिष्ठ भूजल संरक्षण विभाग तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदार यांनी जातीने लक्ष घालावे. बोअरवेल खोदकामाचे दर निश्चित करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, विविध भागांतील दरांमधील तफावत तपासावी आणि शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणुक थांबविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

Back to top button