डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची गरुडझेप

राष्ट्रीय पातळीवर भाकृअपची अ श्रेणीसह अधिस्वीकृती

अकोला /18 नोव्हेंबर- ’शाश्वत शेती आणि संपन्न शेतकरी’ संकल्पना कृतीत उतरवत आर्थिक – सामाजिक संपन्न ग्रामीण भारत घडविण्याकडे अग्रेसर अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती मंडळाने अ श्रेणीची अधिस्वीकृति दिली आहे. मंडळाच्या दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या 44 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सदर अधिकृती दिनांक 29 मार्च 2024 ते 28 मार्च 2029 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू आहे. भाकृअप, नवी दिल्लीचे उपसचिव (कृषी शिक्षण) राजेश कुमार झा यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार विद्यापीठासह परिशिष्टात नमूद केलेल्या महाविद्यालयांमधील आणि संस्थांमधील अभ्यासक्रमांना ही मान्यता लागू आहे. त्यात अकोला येथील पदव्युत्तर शिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, उद्यान विद्या महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयासह नागपूर व सोनापूर (गडचिरोली) येथील कृषी महाविद्यालयांच्या नमूद अभ्यास क्रमांचा समावेश आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल कमांडंट प्रा (डॉ). शरद रामराव गडाख यांचे नेतृत्वात शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने, कृषी अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाचा डॉ. अरविंद सोनकांबळे, सहयोगी अधिष्ठाता सर्वश्री डॉ. शेषराव चव्हाण, डॉ. संजय भोयर, डॉ. शैलेश हरणे, डॉ. प्रकाश कडू, डॉ. राजेंद्र काटकर, डॉ. माया राऊत, आय सी ए आर नोडल सेलचे डॉ. शशांक भराड, डॉ. नितीन कोष्टी, शेतकरी बंधू – भगिनीचा विद्यापीठाच्या या दैदीप्यमान कामगिरीत मोलाचा वाटा आहे.

कुलगुरूंचा कोट

सप्टेंबर 2022 मध्ये कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आजवरच्या चार वर्षेहुन अधिक काळात कृषी शिक्षणाचे आधुनिकीकरण, संशोधन कार्याचा विस्तार, दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता आणि अभिनव विस्तार प्रणालीच्या प्रभावी वापरातून शेतकर्‍यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्यावर विद्यापीठाने भर दिला असून अत्यल्प मनुष्यबळावर देखील सर्वांच्या अथक प्रयत्नातुन विद्यापीठाला अपेक्षित अश्रेणी प्राप्त झाल्याने जबाबदारी अधिक वाढली असून शिक्षणाची गुणवत्ता संशोधनाची उपयुक्तता आणि शेतकर्‍यांपर्यंत पोहोचणार्‍या सेवांचा दर्जा सातत्याने उंचावून हे मानांकन टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. विद्यापीठाच्या या वाटचालीत लाभलेले मार्गदर्शन व सहकार्याबद्दल मा. राज्यपाल तथा कुलपती, मा. मुख्यमंत्री, मा. कृषिमंत्री तथा प्रतिकूलपती, राज्याचे कृषी सचिव, विद्यापीठाचे सर्व आजी -माजी कुलगुरू, संचालक, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे व विद्या परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक आणि सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, पालक, शेतकरी बंधू -भगिनी, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी प्रति कृतज्ञता व्यक्त करतो व भविष्यात देखील सहयोगाची कामना करतो.
-कर्नल कमांडंट प्रा (डॉ). शरद रामराव गडाख

 

Back to top button