बाळापूरमध्ये शिवसेना उबाठाचा दुटप्पी राजकीय चेहरा उघड

मनीष गावंडे भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष यांची टीका

अकोला /17 नोव्हेंबर – बाळापूर विधानसभा मतदार संघातील विकासकामांच्या श्रेयवादा वरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची दुटप्पी भूमिका चव्हाट्यावर आली असून, काम मंजूर झाले की श्रेय घ्यायचे आणि रद्द झाले की भाजपवर खापर फोडायचे, असा खणखणीत टोला भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनीष गावंडे यांनी लगावला आहे.
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून भाजपच्या भक्कम पाठिंब्यावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आज राजकीय भूमिका बदलताच भाजपवरच आरोप सुरू केले आहेत. ज्या भाजप कार्यकर्त्यांनी युतीचा धर्म पाळत निवडणुकीत प्रामाणिक सहकार्य केले आणि ज्या मतदारांनी विश्वास दाखवून मतदान केले, त्याच भाजपला आज राजकीय सोयीसाठी लक्ष्य केले जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. युती असताना भाजपच्या पाठिंब्याचा पुरेपूर लाभ उठवायचा, सत्तेची समीकरणे बदलल्यावर भाजपवर टीका करायची आणि विकासकामांसाठी मात्र भाजप नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्र्यांकडेच पाठपुरावा करायचा, ही नेमकी कोणती राजकीय नीती आहे, असा रोखठोक सवाल भाजप ओबीसी मोर्चा अकोला जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मनीष गावंडे यांनी उपस्थित केला आहे. राज्यात महायुती सरकार सत्तेत असताना मतदारसंघातील कामांसाठी मंत्र्यांकडे पाठपुरावा करून मंजुरी आणायची आणि नंतर स्वतःच्या कर्तृत्वाचा गाजावाजा करायचा, असा प्रकार सुरू आहे. मात्र एखाद्या कामाला प्रशासकीय अडचण आली किंवा निधी वितरणात बदल झाला की थेट भाजप सरकारला जबाबदार धरले जाते.

Back to top button