अमरावती मधिल चोरीचा 72 लाखांचा ऐवज हैदराबादमधून जप्त
470 ग्रॅम सोने, 780 ग्रॅम चांदीसह रोकड मालकास परत

नागपुरी गेट पोलिसांची मोठी कारवाई; अल्पवयीन आरोपी ताब्यात
अमरावती /17 नोव्हेंबर- नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौलाना आझाद कॉलनी येथे 3 महिन्यांपूर्वी झालेल्या मोठ्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. हैदराबाद येथून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत पोलिसांनी चोरीला गेलेले 470 ग्रॅम सोन्याचे दागिने, 780 ग्रॅम चांदी आणि 1 लाख 70 हजार रुपयांची रोकड, असा एकूण 72 लाख 27 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाची आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर हा संपूर्ण मुद्देमाल मंगळवारी 17 नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या हस्ते तक्रारदार मुजतबा जैदी यांना परत करण्यात आला.
मौलाना आझाद कॉलनी येथील रहिवासी मुजतबा जैदी हे काही काळ दुबई येथे वास्तव्यास होते. मात्र, अमरावतीत आल्यानंतर ते याच परिसरात राहत होते. 10 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.
पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे पथक आणि गुन्हे शोध पथकाने स्वतंत्रपणे तपास केला. पोलीस उपनिरीक्षक विकास मनपिया यांच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर पोलिसांनी हैदराबाद येथे जाऊन एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रियेनंतर तक्रारदाराच्या स्वाधीन करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त श्याम घुगे, प्रांजली सोनवणे, सहाय्यक आयुक्त नीलेश ब्राह्मणे, ठाणेदार मनोहर कोटनाके, पोलीस आयुक्तांचे लीडर पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, गुन्हे शोध पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक विकास मनपिया यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





