महामार्गांवरील टोल वसुलीचा विक्रम

6 हजार 640 कोटी रुपयांहून अधिक महसूल जप्त

गतवर्षीच्या तुलनेत 16 टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली/15 नोव्हेंबर-देशातील राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील टोल वसुलीने ऑक्टोबर 2026 मध्ये नवा उच्चांक गाठला आहे. या महिन्यात टोलच्या माध्यमातून 6 हजार 640 कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा झाला. आतापर्यंतची ही सर्वाधिक मासिक टोल वसुली ठरली आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा टोल महसुलात तब्बल 16 टक्क्यांची वाढ झाली आहे.
ऑक्टोबर 2025 मध्ये सुमारे 5 हजार 715 कोटी रुपये जमा झाले होते. यापूर्वी याच वर्षी मे महिन्यात 6 हजार 185 कोटी रुपयांची विक्रमी मासिक टोल वसुली झाली होती. मात्र, ऑक्टोबरमधील महसुलाने हा आकडाही मागे टाकला आहे. सध्याच्या महसूलवाढीचा वेग कायम राहिल्यास 2026 या वर्षात देशातील एकूण टोल वसुली सुमारे 74 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. टोल वसुलीतील वाढीबरोबरच पैसे भरण्याच्या पद्धतीतही मोठा बदल झाला आहे. रोख रकमेचा वापर झपाट्याने कमी होत असून डिजिटल व्यवहारांना वाहनचालकांकडून पसंती मिळत आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये टोल प्लाझांवर रोख स्वरूपात 84 कोटी रुपये जमा झाले होते. यंदा ऑक्टोबरमध्ये हा आकडा घसरून केवळ चार कोटी रुपयांवर आला. याउलट, यूपीआयच्या माध्यमातून ऑक्टोबर 2026 मध्ये सुमारे 100 कोटी रुपयांचे टोल पेमेंट झाले. विशेष म्हणजे, ऑक्टोबर 2025 मध्ये यूपीआयद्वारे टोल वसुलीची नोंद नव्हती. टोल भरण्यासाठी फास्टॅग आणि यूपीआयचा वापर वाढवण्याबाबत सरकारकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे.

Back to top button