शेतकर्यांचा विमा रखडल्याने शिवसेनेचे आमदार आक्रमक
आ.नितीन देशमुख यांचा शासनाला अल्टिमेटम

विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक
अमरावती /5 नोव्हेंबर- आधीच भीषण दुष्काळाचा सामना करणार्या शेतकर्यांना आता पीकविम्याच्या भरपाईसाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा विमा हप्ता कंपन्यांकडे जमा न केल्याने विमा कंपन्यांकडून भरपाई देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप शिवसेनेचे आ. नितीन देशमुख यांनी केला आहे.
कापूस आणि तुरीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करत त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला अकोल्याचे आ.नितीन देशमुख, शिवसेनेचे उपनेते सुधीर सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख पराग गुडधे, जिल्हाप्रमुख मनोज कडू यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर देशमुख यांनी सांगितले की, विमा कंपन्यांनी केवळ सोयाबीन पिकाची नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला शासनाचा विमा हप्त्यातील हिस्सा अद्याप जमा झालेला नसल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे शेतकर्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. 9 ऑक्टोबरच्या शासन निर्णयात केवळ सोयाबीनच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा उल्लेख करण्यात आला असून, कापूस आणि तुरीच्या नुकसानीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप देशमुख यांनी केला. या दोन्ही पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यांचे नव्याने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. शेतकर्यांनी स्वतःच्या वाट्याचा विमा हप्ता भरूनही सरकारकडून आवश्यक रक्कम जमा होत नसल्याने भरपाई रखडल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकार्यांना पंचनाम्याबाबत सूचना देण्याची तयारी दर्शविल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
आधीच कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांनी विम्याचा स्वतःचा हिस्सा भरला आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा कंपन्यांकडे जमा झालेला नसल्याचा आरोप आहे. सोयाबीनसोबत कापूस आणि तुरीच्या नुकसानीचे पंचनामे करून सर्व बाधित शेतकर्यांना भरपाई मिळावी, अशी आमदार नितीन देशमुख यांची मागणी आहे.





