भरधाव दुचाकीची म्हशीला धडक; युवक ठार
एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

अपघातात म्हशीचाही जागीच मृत्यू
बडनेरा/5 नोव्हेंबर – वरुडा गावाजवळील अमरावती महा मार्गावर बुधवारी रात्री भरधाव दुचाकीने म्हशीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दुसरा युवक गंभीर जखमी झाला. या अपघातात म्हशीचाही मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावरून जाणार्या नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, 4 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 8.20 वाजता नवीन वस्ती, बडनेरा येथील विरीश रामदास तिबडे (51) हे आपला मित्र योगेश गुर्जर याच्यासोबत दुचाकीने वरुडा गावाच्या दिशेने जात होते. यावेळी पुलियाजवळ अमरावती एमआयडीसीकडून येणार्या मार्गावर त्यांच्या दुचाकीची म्हशीला जोरदार धडक बसली. धडकेमुळे दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडले. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. घटनास्थळी विरीश तिबडे यांनी तातडीने रुग्णवाहिकेला दूरध्वनी करून मदत मागितली. जखमी युवकाला शुद्ध नसल्याने त्याची ओळख पटविण्यात अडचण आली. मात्र, त्याच्या मित्राने जखमीचे नाव गौरव देवराव विरुळकर आणि मागे बसलेल्या मित्राचे नाव योगेश बाळू (32), रा. लोणी टाकळी, ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती असल्याचे सांगितले. त्यानंतर विरीश तिबडे यांनी अंकुश ढोके यांच्यासह अन्य मित्रांनाही अपघाताची माहिती दिली. दोन्ही जखमींना तातडीने अमरावती येथील इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे गौरव देवराव विरुळकर याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर योगेश भारत बाळूने (32) याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. भररात्री घडलेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बडनेरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.





