मेळघाटातील सौर चरख्याच्या शालीचा दिल्लीत सन्मान
पंतप्रधानांना आदिवासी महिलांची खास भेट

कस्तुराबा संस्थेच्या कारागिरांची कौतुकास्पद भरारी
अमरावती /3 नोव्हेंबर – नवी दिल्लीतील भारत मंडपम येथील आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषदेच्या उद्घाटनावेळी हा अभिमानास्पद प्रसंग घडला. मेळघाटातील खादी ग्रामोद्योग संस्थेच्या कुटीर ब्रँड अंतर्गत आदिवासी कारागीर महिलांनी ही वैशिष्ट्यपूर्ण शाल तयार केली. सौर ऊर्जेवर चालणार्या चरख्याच्या माध्यमातून पारंपरिक धागे विणून आणि त्यावर झाडांच्या पानांचे आकर्षक नैसर्गिक ठसे देऊन ही सुंदर शाल साकारण्यात आली. हा सोहळा 2 ते 5 नोव्हेंबर दरम्यान पार पडत असून त्यात जगभरातील 130 हून अधिक देशांचे प्रतिनिधी, 40 हून अधिक मंत्री, धोरणकर्ते, उद्योजक, संशोधक आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी उपस्थित राहिली.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या पाठबळामुळे अमरावती जिल्ह्यात विकेंद्रित सौर चरखा प्रकल्प यशस्वीपणे सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचे संपूर्ण काम कस्तुराबा सोलर खादी महिला समिती ही संस्था अतिशय निष्ठेने सांभाळत आहे. संस्थेने मेळघाटातील गावाखेड्यांतील आदिवासी भगिनींना सोबत घेऊन सौर चरख्यावर सूत कातणे, हातमागावर कापड तयार करणे आणि कपड्यांवर सुंदर कलाकुसर करण्याचे हक्काचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे डोंगरदर्यात राहणार्या कष्टकरी महिलांच्या हाताला थेट गावातच चांगला रोजगार मिळाला.
डोंगरभागातील बिकट परिस्थितीवर मात करत महिलांनी सूर्यप्रकाशाच्या स्वच्छ ऊर्जेवर काम उभे केले. विषारी धूर किंवा प्रदूषण न पसरवता पर्यावरणपूरक पद्धतीने सूत तयार झाल्यामुळे निसर्गाचे रक्षण झाले आणि खादीच्या कामाला नवे रूप मिळाले. स्थानिक बचत गटांच्या महिलांनी स्वबळावर उभे राहून दाखवलेली ही कमाल देशाच्या आत्मनिर्भर भारताच्या हाकेला प्रत्यक्षात आणणारी ठरली. मेळघाटातील महिलांनी तयार केलेल्या या अनोख्या शालीने निसर्गाचे रक्षण आणि ग्रामीण विकासाचा मोठा संदेश थेट देशाच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचवला.पर्यावरण रक्षण अन् महिलांच्याहाताला रोजगारमेळघाटातील कस्तुराबा संस्थेच्या भगिनींनी सौर ऊर्जेवर सूत कातून आणि हातमागावर वस्त्र विणून आत्मनिर्भरतेची नवी वाट दाखवली. झाडांच्या पानांच्या नैसर्गिक रंगात सजलेली ही देखणी शाल निसर्गाचे रक्षण करते. महिला बचत गटांना गावातच कायमचा रोजगार देऊन स्वावलंबी बनवणारा हा उपक्रम आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आदर्श ठरला.
अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाटातील आदिवासी महिलांनी सौर चरख्यावर विणलेली आणि झाडांच्या पानांचे नैसर्गिक ठसे उमटवून तयार केलेली देखणी कलाकुसरीची शाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवी दिल्लीत आदराने भेट देण्यात आली. नवीकरणीय ऊर्जा परिषदेच्या भव्य मंचावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही शाल पंतप्रधानांना सुपूर्द केली. आधुनिक तंत्रज्ञान, जुनी हातमाग कला आणि पर्यावरण रक्षणाचा सुंदर मेळ घालत मेळघाटातील भगिनींनी थेट देशाच्या पातळीवर जिल्ह्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा मोठा नावलौकिक मिळवून दिला.





