राजापेठ उड्डाणपुलावर भरधाव कारचा अपघात

दुभाजकाला धडकून 200 मीटरपर्यंत फरफटत गेली

सुदैवाने मोठा अनर्थ टळला; चालक प्रवाशांसह घटनास्थळावरून पसार

अमरावती /20 सप्टेंबर- राजापेठ उड्डाणपुलावरून उतरताना चालकाचा ताबा सुटल्याने एक भरधाव मोटार थेट दुभाजकावर चढून तब्बल 200 मीटरपर्यंत फरफटत गेल्याची थरारक घटना रविवारी रात्री घडली असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही तरीही अपघातानंतर चालक प्रवाशांसह पळून गेला आणि गणेशोत्सवाच्या गर्दीत पोलिसांनी तातडीने धाव घेत क्रेनच्या साहाय्याने वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
इर्विन चौकाकडून राजापेठच्या दिशेने एमएच 46 एन 0310 क्रमांकाची मोटार सुसाट वेगाने निघाली होती. रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास कुथे रुग्णालयासमोर ही मोटार पुलावरून खाली उतरत असताना अचानक चालकाचा ताबा सुटला. गाडी भरधाव वेगाने थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या सिमेंटच्या दुभाजकावर चढली आणि मोठा आवाज करत सुमारे 200 मीटरपर्यंत घासत पुढे निघून गेली. गाडीचा भयानक आवाज ऐकून आजूबाजूचे लोकभयभीत झाले. या भीषण घटनेत दुभाजकाचे नुकसान झाले असले तरी रस्त्यावरील इतर नागरिक आणि मोटारीतील लोक सुदैवाने बचावले.
अपघात घडताच मोटारीत बसलेल्या लोकांनी काळवेळ न पाहता गाडी तिथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. रस्त्याच्या मधोमध दुभाजकावर गाडी अडकून पडल्याने दोन्ही बाजूंनी येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली. सध्या शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असल्याने रस्त्यावर आधीच भक्तांची आणि वाहनांची तुफान गर्दी पाहायला मिळत होती. त्यातच पुलाच्या तोंडावर हा राडा झाल्याने वाहतुकीचा पुरता फटका बसू लागला होता.
घटनेची खबर मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप चव्हाण हे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार आणि गृहरक्षक दलाच्या जवानांसह काही क्षणात घटनास्थळी हजर झाले. गर्दीचा वाढता ताण ओळखून त्यांनी लगेच क्रेन पाचारण केली. अडकलेली मोटार टोचन करून बाजूला काढण्यात आली आणि खोळंबलेला रस्ता मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पोलिसांनी सदर मोटार ताब्यात घेऊन ठाण्यात लावली असून चालक कोण होता आणि गाडी इतक्या वेगात का चालवली जात होती याचा शोध घेत पुढील कायदेशीर पाऊल उचलले जात आहे.

Back to top button