27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत देणार दाखले

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत वस्तीनिहाय शिबीरांचे आयोजन

विमुक्त व भटक्या समाजासाठी राज्यभर विशेष हक्क आणि प्रमाणपत्र मोहीम

मुंबई /20 सप्टेंबर: राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा आणि आवश्यक प्रमाणपत्रांचा थेट लाभ देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून 27, 28 ,29 सप्टेंबर 2026 दरम्यान राज्यभरात विशेष भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान आयोजित करण्यात येत आहे.
शासनाच्या ’राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानात ही विशेष मोहीम राबवली जाणार असून, विविध स्वरूपाचे अकरा दाखले आणि पाच शासकीय योजनांचे लाभ दिले जाणार आहेत.
महसूल विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंडळ व तालुका स्तरावर हीवस्तीनिहाय शिबीरे घेतली जाणार आहेत. या विशेष अभियानानंतर दर तिमाहीच्या पहिल्या मंगळवारी हे अभियान नियमितपणे आयोजित केले जाईल. एकाच छताखाली मिळणार सर्व प्रमाणपत्रे व योजनांचे लाभ या तीन दिवसांच्या विशेष शिबीरांमध्ये नागरिकांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमीलेयर, रहिवास दाखला, आयुष्मान भारत कार्ड, विवाह नोंदणी आणि दिव्यांग प्रमाणपत्रे तात्काळ वितरीत केली जातील. याशिवाय, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम किसान योजनेचे प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना हस्तांतरित केले जातील.
प्रशासकीय यंत्रणेने अभियानापूर्वीच वस्तीनिहाय लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, अशा स्पष्ट सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या जिल्हा, तालुका आणि पालिका प्रशासनाचा राज्य शासनाकडून विशेष गौरव करण्यात येणार आहे.

Back to top button