एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक

2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, ड्रग इन्स्पेक्टर भरतीही रद्द

मुंबई/26 ऑगस्ट-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक अर्थात ड्रग इन्स्पेक्टर (ग्रुप-ब) पदाच्या भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात सहा जणांना अटक केली असून, सर्व आरोपींना मुंबईतील किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या सर्वांची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, पेपरफुटीच्या तक्रारी आणि प्राथमिक तपासातील निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर  MPSC ने खाद्य व औषध प्रशासन विभागातील ड्रग इन्स्पेक्टर (ग्रुप-ब) पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली असून, आता या पदांसाठी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.
या प्रकरणात MPSC चे अंडर सेक्रेटरी अभिजीत लेंडवे यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्यासह आयोगाचे दोन सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांनाही अटक करण्यात आली आहे. पेपरफुटीचा आरोप सर्वप्रथम करणार्‍या गौरवपाटील याची भूमिकाही पोलिसांच्या तपासाच्या कक्षेत असून त्याच्याकडे संशयित म्हणून पाहिले जात आहे. याशिवाय परीक्षेला बसलेल्या ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि पेपरफुटीचा कथित मास्टरमाइंड प्रवीण पाटील यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात नेमकी पेपरफुटी कशी झाली आणि त्यामागे कोणाची भूमिका होती, याचा तपास सध्या सुरू आहे.
दरम्यान, चझडउला 22 ते 26 जुलैदरम्यान काही उमेदवार आणि लोकप्रतिनिधींकडून परीक्षेतील गैरप्रकाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. 22 मार्च 2026 रोजी झालेल्या स्क्रीनिंग परीक्षेच्या सुमारे दोन दिवस आधी, म्हणजे 20 मार्च रोजी काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा त्यातील प्रश्न मिळाल्याचा आरोप या तक्रारींमध्ये करण्यात आला होता. हे प्रश्न सोशल मीडिया किंवा इतर डिजिटल माध्यमांतून प्रसारित झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन चझडउने 27 जुलै रोजी मुंबई पोलिसांकडे चौकशीची मागणी केली. त्यानंतर गुन्हे शाखेने प्राथमिक तपास करून आयोगाला अहवाल सादर केला. या अहवालानुसार, प्रथमदर्शनी एका उमेदवाराला परीक्षेपूर्वी प्रश्नांचा संच मिळाला होता आणि त्याचा त्याला फायदा झाल्याचे आढळून आले. मात्र, संपूर्ण प्रश्नपत्रिका फुटली किंवा अनेक उमेदवारांना त्याचा लाभ झाला, असे आयोगाने म्हटलेले नाही.
या पार्श्वभूमीवर चझडउने 25 ऑगस्ट रोजी ड्रग इन्स्पेक्टर (ग्रुप-ब) पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. परीक्षेची गोपनीयता, निष्पक्षता, पारदर्शकता आणि भरती प्रक्रियेवरील उमेदवारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. आता या पदांसाठी नव्याने स्क्रीनिंग परीक्षा घेतली जाणार आहे. आधीच्या भरती प्रक्रियेत अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच फेरपरीक्षेसाठी त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. नव्या परीक्षेची तारीख आणि अन्य तपशील स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहेत.

12 लाखांची कथित डील, 5 लाखांचा व्यवहार
तपासानुसार, परीक्षार्थी ऋतुजा पाटील हिने वडील अमृत पाटील यांच्याकडे पेपर मिळवून देण्याबाबत सांगितले. त्यानंतर अमृत पाटील कथित मध्यस्थ प्रवीण पाटीलच्या संपर्कात आला. मयूर ठाकरे याने दोघांची ओळख करून दिल्याचे तपासात समोर आले आहे. प्रवीण पाटील नंदुरबारमध्ये कोचिंग क्लास चालवतो.
प्रवीण पाटील आणि चझडउमधील अटक अधिकार्‍यांमध्ये सुमारे 5 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button