शहरात ईद मिलाद उत्साहात साजरी

नेते, जनप्रतिनिधींनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

पोलिस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त

अमरावती/26 ऑगस्ट- ईद मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वानिमित्त अमरावती शहरात बुधवारी मोठ्या उत्साहात भव्य मिरवणूक काढण्यात आली. हजारो अकीदतमंदांनी सहभागी होत धार्मिक उत्साह व्यक्त केला. हातात इस्लामी झेंडे घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी विविध मार्गांवरून मिरवणूक काढत शांतता, प्रेम, माणुसकी आणि बंधुभावाचा संदेश दिला. मिरवणुकीदरम्यान विविध सामाजिक संघटनांकडून स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी पाणी, शरबत, फळे, मिठाई तसेच इतर खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. वैद्यकीय मदत आणि पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली.
मिरवणुकीची सुरुवात हत्तीपुरा येथील हजरत मिस्कीन शाह मियां मशीद परिसरातून झाली. मशीदचे इमाम तसेच शहराचे मुफ्ती मुफ्ती शहफुद्दीन साहेब यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक मार्गस्थ झाली. यावेळी उलेमा, समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला, मुले आणि ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक हत्तीपुरा, नागपुरी गेट नाका, असोर्‍या पेट्रोल पंप, हबीबनगर, रतनगंज, इतवारा बाजार, चांदणी चौक, नागपुरी गेट चौक आणि पठाण चौक मार्गे हैदरपुरा येथील मद्रासी बाबा परिसरात पोहोचली. विविध ठिकाणी सामाजिक, धार्मिक आणि व्यावसायिक संघटनांनी मिरवणुकीचे स्वागत केले. आयोजन समितीचे अध्यक्ष हाजी मोहम्मद अशफाक, मुख्य सचिव हाजी अफसर बेग, सहसचिव मोहम्मद इक्बाल, खजिनदार सय्यद निसार यांच्यासह उमर खान, आरिफ हुसेन सुबेदार, मोहम्मद अय्युब खान, मोहम्मद सिराज बाली, इस्माईल रामाणी, हाजी रिजवान, हाजी मुश्ताक, वसीम रजा, कासिम मेमन, इलियास भाई, रफीक भाई आणि इलियास मेमन यांची उपस्थिती होती. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला. पोलीस उपायुक्त यशवंत सोलंके आणि शाम खुळे यांनी मिरवणुकीचे स्वागत केले. यावेळी मुफ्ती शहफुद्दीन साहेब यांनी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याबद्दल आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून आ. संजय खोडके, आ. सुलभा खोडके आणि नेते यश खोडके यांनी शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, नगरसेवक बबलू शेखावत, मिलिंद चिमोटे आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश रतावा यांनीही मिरवणूक मार्गावर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

शांततेचा संदेश ठरला मिरवणुकीचा केंद्रबिंदू

मिरवणुकीतून ईदचा आनंद साजरा करण्यासोबतच समाजात शांतता, माणुसकी, प्रेम, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा 6 कायम ठेवण्याचा संदेश देण्यात आला. युवकांनी शिस्त राखत मिरवणुकीचे नियोजन केले आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले.

संबंधित बातम्या

Back to top button