डफरीनच्या घटनेचे राजकारण करु नका

आ.रवि राणा यांची डफरीन रुग्णालयाला भेट

दोषींवर कठोर कारवाई करा

अमरावती /26 ऑगस्ट– डफरीन रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाला लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण अमरावती हादरली आहे. या घटनेनंतर आ. रवी राणा यांनी रुग्णालयाची पाहणी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. अशा दुःखद घटनेचे राजकारण न करता आगीचे नेमके कारण शोधून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाय करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आणि बडनेरा मतदारसंघाचे आ. रवी राणा यांनी बुधवारी दुपारी जिल्हा स्त्री रुग्णालयातील डफरीन रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी दोन दिवसांपूर्वी आगीच्या घटनेत बाधित झालेल्या नवजात अतिदक्षता कक्षाची पाहणी केली. यावेळी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. आ. राणा यांनी सांगितले की, तीन नवजात बालकांच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेवरून काही जण राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करीत असतील तर ते योग्य नाही. मृत बालकांच्या कुटुंबीयांचे दुःख लक्षात घेऊन दोषींवर कारवाई आणि रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेची काटेकोर तपासणी याला प्राधान्य दिले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या घटनेची गांभीर्याने दखल घेत असून चौकशीवर लक्ष ठेवून आहेत. उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून अहवालाच्या आधारे जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असे राणा यांनी सांगितले. डफरीन रुग्णालयातील आगीबाबत प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणला अग्निसुरक्षा तपासणी पूर्ण झाल्याची माहिती दिली होती. मात्र त्यानंतरही आवश्यक खबरदारी घेतली गेली नसल्यास संबंधित अधिकार्‍यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी मागणी राणा यांनी केली. आगीच्या वेळी रुग्णालयातील अग्निसूचक यंत्रणा का कार्यरत झाली नाही आणि पाण्याची फवारणी करणारी यंत्रणा वेळेत का सुरू झाली नाही, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. आगीच्या वेळी जीव धोक्यात घालून नवजात बालकांचे प्राण वाचविणार्‍या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आ. राणा यांनी कौतुक केले. डफरीनमध्ये ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला उपचार आणि प्रसूतीसाठी येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाची असून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

Back to top button