माजी पालकमंत्री डॉ.सुनील देशमुख यांनी केला डफरीन रुग्णालयाला दौरा
अग्निकांडाच्या वॉर्डची पाहणी, पीडित कुटुंबियांचे सांत्वन, रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त

अमरावती /25 ऑगस्ट- डफरीन रुग्णालय (जिल्हा स्त्री रुग्णालय) येथील एनआयसीयू विभागात भीषण आग लागून तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देऊन चौथ्या मजल्यावरील एनआयसीयू कक्षाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पीडित कुटुंबांचे सांत्वन केले.
डॉ. सुनील देशमुख यांनी या भीषण दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करत रुग्णालय प्रशासन, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाला जाब विचारला. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पत्रकार परिषदेत अमरावतीतील दुरवस्था, लोकप्रतिनिधींचा निष्काळजीपणा आणि मूलभूत सुविधांच्या अभावावर बोट ठेवले होते. तेव्हा त्यांच्या आरोपांना राजकीय प्रेरित म्हटले गेले, पण या दुर्घटनेने ते आरोप सत्य असल्याचे सिद्ध केले आहे, असे ते म्हणाले.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आतातरी गांभीर्याने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी डॉ. सुनील देशमुख यांच्यासोबत माजी मंत्री ड. यशोमती ठाकूर आणि माजी महापौर विलास इंगोले उपस्थित होते. सर्व नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केली.




