प्रत्येक नगरसेवकांना मिळणार 50 लाखाचा विकास निधी

मनपा आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले यांची मान्यता

अमरावती/25 ऑगस्ट: तब्बल चार वर्षाची प्रशासक राजवट संपून यंदाच्या जानेवारीमध्ये महापालिकेत लोकनियुक्त कारभार सुरू झाला. मात्र, बिकट आर्थिक स्थितीमुळे गेल्या आठ महिन्यांत नगरसेवकांच्या प्रभागात साध्या रुपयाचेही काम झाले नव्हते. यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जाणार्‍या लोकप्रतिनिधींना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांच्या मागणीची दखल घेत प्रत्येक नगरसेवकाला 50 लाख रुपयांचा विकास निधी देण्यास मंजुरी दिली आहे.
या निधीतून नगरसेवकांना आपापल्या प्रभागात दरकराराद्वारे सोयीनुसार विकास कामे करता येणार आहेत. महापालिकेच्या 22 प्रभागांमधून थेट निवडणुकीद्वारे 87 आणि 8 नामनिर्देशित अशा एकूण 95 नगरसेवकांचा कारभार जानेवारीपासून सुरू आहे. मात्र, जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यांच्या कालावधीत सौम्या चांडक, वर्षा लड्डा आणि आता डॉ. मंगेश गोंदावले अशा तीन आयुक्तांनी प्रशासकीय धुरा सांभाळली. या प्रशासकीय फेरबदलात आणि महानगरपालिकेच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रभागांमधील विकास कामे पूर्णपणे रखडली होती. निवडणुकीत मोठी आश्वासने देऊन विजयी झालेल्या नगरसेवकांना प्रभागात कामे करता येत नसल्याने असंतोषाचा सामना करावा लागत होता. मात्र आता समाधान व्यक्त केले जात आहे. प्रत्येक कामाचे मनपाच्या संबंधित अभियंत्याकडून अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मंजुरी घेणे अनिवार्य असेल. दर कराराने होणार्‍या कामांच्या दर्जाची तपासणी गुणवत्ता नियंत्रण पथकाकडून केली जाईल आणि त्यानंतरच संबंधित कंत्राटदाराचे बिल पास होईल.प्रभागातील कोंडी फुटण्यासाठी महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, पक्षनेते चेतन गावंडे आणि विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी आयुक्तांकडे दर करारातून 1 कोटी रुपयांची विकास कामे करण्याची मुभा देण्याची मागणी केली होती. आर्थिक स्थिती लक्षात घेता आयुक्तांनी तूर्तास 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे आता रखडलेली नागरी कामे मार्गी लागणार असून नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button