अंजनगावच्या नताशा गवईचे सीए परीक्षेत सुयश

अंजनगाव सुर्जी/3 जुलै : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर स्वप्नांना यशाची पंखे लाभतात, याची प्रचिती अंजनगाव सुर्जी येथील कु. नताशा नामदेवराव गवई हिने करून दिली आहे. देशातील अत्यंत प्रतिष्ठित आणि स्पर्धात्मक समजल्या जाणार्‍या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) फाऊंडेशन परीक्षेत तिने घवघवीत यश संपादन करत अंजनगाव सुर्जीच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा ठसा उमटविला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सीए होण्याचे स्वप्न पाहणार्‍या हजारो विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशन परीक्षा ही पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जाते. कठोर अभ्यास, सातत्यपूर्ण तयारी आणि आत्मविश्वासाच्या बळावर नताशाने ही पायरी यशस्वीरीत्या पार करत आपल्या उज्ज्वल भविष्यातील भक्कम पाया रचला आहे. तिच्या या यशाने केवळ कुटुंबीयांचाच नव्हे, तर संपूर्ण अंजनगाव शहराचाही गौरव वाढविला आहे.
नताशाचे वडील नामदेवराव गवई हे अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयात कार्यरत असून आई गृहिणी आहेत. साधेपणा, शिस्त आणि शिक्षणावरील निष्ठा या कुटुंबीयांनी दिलेल्या संस्कारांसह स्वतःच्या अथक मेहनतीच्या बळावर नताशाने हे यश संपादन केले आहे. मर्यादित परिस्थितीतही मोठी स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात साकार करण्याची तिची जिद्द अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button